टिळक उद्यानाचे तलावात रूपांतर अव्यवहार्य
तज्ज्ञांच्या समितीची उच्च न्यायालयात माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : कांदिवली (पश्चिम) येथील १०० वर्षांपूर्वीचा खजुरिया तलाव बुजवून तलावाची भरपाई म्हणून त्यालगतच असलेले बाळ गंगाधर टिळक उद्यान पर्यायी जलस्रोत म्हणून विकसित करणे व्यवहार्य नसल्याची माहिती महापालिकेच्या तज्ज्ञांच्या समितीने सोमवारी (ता. १) उच्च न्यायालयाला दिली. हे उद्यान बांधण्यासाठी पावणेतीन कोटी रुपयांचा खर्च केला असून, सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे या उद्यानाबाबत पर्यायी जलस्रोताची बाब अव्यवहार्य असल्याचेही न्यायालयाला सांगितले.
बुजवलेल्या खजुरिया तलाव परिसरात पर्यायी जलस्रोत विकसित करण्याची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीला दिले होते. या पार्श्वभूमीवर खजुरियाशेजारीच असलेल्या टिळक उद्यानाचे तलावात रूपांतर शक्य आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी तज्ज्ञांच्या समितीला केली होती. त्याबाबतचा व्यवहार्यता अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सोमवारी सुनावणी झाली.
टिळक उद्याने पर्यायी जलस्रोत म्हणून विकसित करणे व्यवहार्य नसल्याचे समितीने निष्कर्षाच्या अहवालात म्हटल्याची माहिती महापालिकेच्या वतीने वकील अक्षय शिंदे यांनी न्यायालयात दिली. या उद्यानाचा परिसरातील आबालवृद्ध लाभ घेत असून, तेथे मुक्त व्यायामशाळा आणि अन्य सुविधाही उपलब्ध आहेत. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बुजवलेल्या खजुरियापासून साडेतीन किमी अंतरावर मालवणी येथे भरपाई म्हणून पर्यायी जलस्रोत विकसित करणे शक्य असल्याच्या दाव्याचाही शिंदे यांनी पुनरुच्चार केला.
------------
बुजवलेले एकही जलाशय नाही!
मालवणीतील जागा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येते. तसेच ती पर्यायी जलस्रोत म्हणून विकसित करण्यासाठी महापालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद मोरे यांनी न्यायालयाला दिली. मुंबई शहरात बुजलेले एकही जलाशय नाही; परंतु मुंबई उपनगरात १४ नैसर्गिक जलस्रोत असल्याची माहितीही मोरे यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन हा सर्व तपशील प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.