घाटकोपरच्या प्रभाग १२८मध्ये वर्चस्वासाठी लढाई
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. २ : घाटकोपर पश्चिमेतील प्रभाग क्रमांक १२८ मध्ये यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट), मनसे, शिवसेना (शिंदे) आणि भाजपामध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. घाटकोपर पश्चिमेतून चार वेळा निवडून आलेले राम कदम यांनी येथून सहा हजारांचे मताधिक्य घेतल्याने भाजपदेखील ठाकरे गटाची ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे दिसते.
घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १२८ हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या मनसेत असलेले दशरथ शिर्के आणि त्यांच्या पत्नी शुभांगी शिर्के यांनी २७ वर्षे नगरसेवक म्हणून या प्रभागात सत्ता गाजवली. त्यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीत साईभक्त म्हणून प्रसिद्ध असलेले दीपकबाबा हांडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ते नगरसेवक म्हणून जिंकून आले.
अपक्ष म्हणून निवडून आलेले दीपकबाबा हांडे यांनी त्यानंतर अधिकृतरीत्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. २०१७च्या पालिका निवडणुकीत हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी अश्विनी हांडे यांनी निवडणूक लढवली. त्या वेळी त्यांनी सात हजारांहून अधिक मताधिक्य घेतले होते. २०१७च्या निवडणुकीत शुभांगी शिर्के यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरत ४,९१० मते मिळवली.
सध्या दीपकबाबा हांडे आणि अश्विनी हांडे हे शिवसेना शिंदे गटात आहेत, तर शिर्के हे मनसेत आहेत. या प्रभागातून भाजपाने विधानसभेत चांगली मते घेतली असल्याने या प्रभागात प्रत्येक उमेदवार वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. दीपकबाबा हांडे हे साईभक्त असून, त्यांच्यामागे मोठा जनाधार आहे. तर शिर्के परिवार आजही लोकांच्या संपर्कात राहून कार्य करीत आहे. भाजपनेदेखील या प्रभागात विशेष लक्ष दिले असल्याने या प्रभागात चुरस पाहायला मिळणार हे निश्चित.
प्रभाग १२८ हा झोपड्या आणि कॉलनीचा परिसर. या प्रभागात संपूर्ण भटवाडी, रामजीनगर, बर्वेनगर म्युनिसिपल कॉलनी, गणेशवाडी, जीवदया लेन, जागृतीनगरचा काही परिसर येतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ४९,७१६ इतकी असून, आताच्या मतदार नोंदणीनुसार त्यात वाढ झाली आहे. या प्रभागात मराठी मतदार मोठ्या संख्येने असून गुजराती, उत्तर भारतीय, जैन समाजाची लोकसंख्याही लक्षणीय आहे. या प्रभागातून शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येत आहे. रुग्णालय, मैदाने, सभागृह यांची कमतरता नाही.
लोकसभा विधानसभेतील चित्र
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय दिना पाटील हे विजयी झाले आहेत, तर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे राम कदम सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. या प्रभागात भाजपने विधानसभेत सहा हजारांचे मताधिक्य घेतले आहे. विधानसभेत मनसेचे गणेश चुक्कल यांना ४,९३७ मते मिळाली. भाजपचे राम कदम यांना १३,२५४ मते मिळाली, तर शिवसेना ठाकरे गटाचे संजय भालेराव यांना ७,१६४ मते मिळाली.
प्रमुख समस्या
पाण्याची समस्या मोठी आहे. तसेच गटार लाईन खराब आहे. समाजकल्याण मंदिर बांधून तयार असूनही अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाही. विभागात चोरीच्या घटना घडतात.
२०१७चा निकाल
अश्विनी दीपकबाबा हांडे -
शिवसेना : १२,९८०
शुभांगी दशरथ शिर्के
अपक्ष : ४,९१०
प्राची प्रवीण विचारे
भाजपा : ४,८९८
तरुणांसाठी व्यायामशाळा, नवीन तंत्रज्ञान असणाऱ्या अभ्यासिका यांचा समावेश करावा. तरुणांना व्यसनापासून दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
- अनिकेत दिलीप दिवेकर, सामाजिक कार्यकर्ते
या प्रभागाला भेडसावणाऱ्या समस्या फारशा नाहीत. मुक्ताबाई रुग्णालयात सर्व रुग्णांना सर्व सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करावा. स्वच्छतेवर अधिक भर द्यावा.
- महेश पौळ, मतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.