समग्र शिक्षेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
नागपूर अधिवेशनात बेमुदत उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : समग्र शिक्षेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्याने कर्मचारी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. येत्या ८ डिसेंबरपासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा समितीने दिला. या उपोषणात ठाणे जिल्ह्यातील १०८ अधिकारी व कर्मचारीदेखील उपस्थित राहणार आहेत.
समग्र शिक्षेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करून कायम नियुक्ती करावी, कायम नेमणुकीचा निर्णय न झाल्यास ‘स्वेच्छामरण’ परवानगी द्यावी या दोन प्रमुख मागणीसह अल्पमुदतीचे करार, स्थैर्याचा अभाव आणि कोणतीही सुविधा नसल्याने कर्मचारी मानसिकदृष्ट्या ढासळत आहेत.
गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली असून, अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. ८ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार काही कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले; मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचे समितीचे म्हणणे आहे. पंजाब, मणिपूर, सिक्कीम येथे समग्र शिक्षेतील कर्मचाऱ्यांना कायम सेवा; तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाममध्ये पगार व सुविधाही उपलब्ध आहेत; मात्र महाराष्ट्रात या सुविधा नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच आठ वर्षे मानधनात वाढ नाही; कोणत्याही शासकीय सेवासुविधा मिळत नसल्याने रोष व्यक्त केला.
सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याचा आरोप केला. ५८ वर्षांनंतर कोणत्याही प्रकारचा आर्थिक आधार नसल्याने भविष्य पूर्णतः अंधारमय या दीर्घकाळ चाललेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य वाढले असून आंदोलनादरम्यान कोणतीही अघटित घटना घडल्यास त्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
विविध स्वरूपातील आंदोलन
उपोषणासोबत कर्मचाऱ्यांकडून शंखनाद, थाळीनाद, टाळनाद, घंटानाद, मूक आंदोलन, आक्रोश मोर्चा, भीक मांगो तसेच आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर सहाव्या दिवसापासून कुटुंबियांसह लहान मुलांसह मोर्चात सहभाग घेण्याची तयारीही समितीने दर्शवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.