वनईतील तीन पाड्यांना दिलासा
स्मशानभूमी रस्ता, पुलाच्या कामाला सुरुवात; आमदार गावितांच्या हस्ते भूमिपूजन
कासा, ता. २ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील वनई परिसरातील वाणीपाडा, धडपपाडा आणि कोरडपाडा या तीन पाड्यांतील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या भागात स्मशानभूमी रस्ता, शेतीसाठी मार्ग तसेच प्लॉट क्षेत्राकडे जाणारा पूल उभारण्याच्या कामांना अधिकृत सुरुवात झाली आहे. या दोन महत्त्वपूर्ण सुविधांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम १७ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कामांचे भूमिपूजन पालघरचे आमदार राजेंद्र गावित आणि ॲड. विराज गडग यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात शेतीकडे जाण्यासाठी मार्ग नसणे, बैलगाड्या व मालवाहतूक अडथळ्यात येणे, तसेच स्मशानभूमीसाठी योग्य रस्त्याचा अभाव या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड अडचणी सोसाव्या लागत होत्या. पावसाळ्यात नदी-नाले भरल्याने मृतदेह वाहून नेणेही अत्यंत कठीण होत असे. वनई परिसरातील प्रश्न वारंवार युवा एल्गार आघाडी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या दारात मांडण्यात आले. त्यानंतर आमदार राजेंद्र गावित यांनी परिस्थितीची पाहणी करून आपल्या आमदार निधीतून या दोन कामांना मंजुरी दिली. त्यानुसार २९ नोव्हेंबर २०२५ पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून, ग्रामस्थांमध्ये मोठा समाधानाचा भाव आहे.
......................
स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग
भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार गावित यांच्यासह ॲड. विराज गडग, डॉ. स्वप्नील गडग, सरपंच कामिनीताई जनाठे, सदस्य दिनेश मोर, संतोष तल्हा, रामचंद्र गडग, तुळशी गडग, रजनी गडग, अंकुश दौडा, शैलेश गडग, दामा कोरडा, दशरथ काठे, कल्पेश बसवत तसेच वाणीपाडा व कोरडपाडा येथील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामांमुळे पाड्यांमध्ये उत्साहाचे आणि विकासाच्या दिशेने वाटचालीचे वातावरण निर्माण झाले आहे.