कल्याणमध्ये मीटरप्रमाणे रिक्षाला हरताळ
दिवसभरात मोजकेच प्रवासी मिळाल्याने चालकांची माघार
कल्याण, ता. २ (वार्ताहर) : रेल्वेस्थानक पश्चिम परिसरातून प्रवाशांच्या वाढत्या मागणीवरून उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि कल्याण रिक्षा चालक टॅक्सी महासंघाने मीटरप्रमाणे रिक्षा शहराच्या विविध भागात जाण्यासाठी सुरू करावी म्हणून परिवहन विभागाकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आरटीओ अधिकारी आणि रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मीटरप्रमाणे रिक्षा सुरू केली होती. मीटरप्रमाणे रिक्षाचालकांची एक रांग निर्माण करण्यात आली होती. सुरुवातीचे दोन दिवस मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. यानंतर मात्र मीटर रिक्षांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने संबंधित रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. यामुळे मीटरप्रमाणे रिक्षा सेवेला हरताळ फासला जात असल्याचे दिसत आहे.
कल्याण पश्चिम रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर शहराच्या विविध भागात जाण्यासाठी अनेक वेळा रिक्षा मिळणे अवघड होते. शेअर पद्धतीने रिक्षाने प्रवासी वाहतूक केली, तर त्यासाठी रेल्वेस्थानक भागातील रिक्षा वाहनतळावर ताटकळत उभे राहावे लागते. अनेक प्रवासी मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करावी म्हणून रिक्षाचालकांना सांगतात, परंतु चालकांनी नकार दिल्याने प्रवाशांचा हिरमोड होतो. या पार्श्वभूमीवर अनेक प्रवाशांनी मीटरप्रमाणे रिक्षासेवेची मागणी केली होती. गेल्या १० दिवसांपूर्वी कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आशुतोष बारकुळ यांनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर, संतोष नवले आणि इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कल्याण पश्चिम रेल्वेस्थानकाजवळून किमान दोन रांगा मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी तात्काळ मान्य केली. त्याप्रमाणे रिक्षा संघटनेच्या सूचनेप्रमाणे पहिल्या टप्प्यात एका स्वतंत्र रांगेतून पन्नास रिक्षा मीटरप्रमाणे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या मीटर सेवेला वाहतुकीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला की मग वाढीव रांगा तयार करण्याचे नियोजन होते, परंतु मीटर सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षा चालकांनी पुर्वीप्रमाणे शेअर रिक्षा सुरू केल्या आहेत.
मीटर भाडे महाग
मीटरप्रमाणे प्रवासी भाडे शहराच्या विविध भागात जाण्यासाठी ३० ते ५० रुपये होते. याच मार्गावरील शेअर पद्धतीचे भाडे मात्र १५ ते २५ रुपये असते. त्यामुळे मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक केली, तर मोठा भुर्दंड बसेल, असा विचार करून प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरविल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसभरात १० ते १५ प्रवासीपण मीटरप्रमाणे वाहतुकीसाठी तयार होत नसल्याने रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही चालकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे रिक्षाचालकांनी पुन्हा नेहमीच्या रांगेतून शेअर पद्धतीने प्रवासी वाहतूक सुरू केली आहे.
अनधिकृत थांब्यांमुळे अडथळा
मीटरप्रमाणे रिक्षा भाडे प्रवासी सुविधा लोकापर्यंत जनजागृतीमुळे पोहोचू शकली नाही, तर दीपक हॉटेल परिसरातून तत्काळ रिक्षा नियोजित ठिकाणी जाण्यास मिळत असल्याने आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे हा अनधिकृत थांबा शेअर रिक्षाचालकांच्या पथ्यावर पडला असल्याने काही रिक्षा प्रवाशांनी ओरड केली आहे.
प्रवासी संघटनेचा विरोध
आमच्यासारखे हजारो प्रवासी मीटर रिक्षाने जायला तयार असतानही समाजमाध्यमातून मीटर रिक्षाला प्रतिसाद नसल्याचा खोटा अपप्रचार केला जातोय. मीटर पद्धतीने रांगेत कुठल्याही रिक्षा लागत नाहीत. याशिवाय येथे अनधिकृतपणे इतर खासगी सरकारी गाड्या उभ्या केल्या जातात. एकही वाहतूक पोलिस या ठिकाणी रिक्षा रांगेत का नसतात याच्यावर देखरेख करीत नाहीत. अनेक प्रवासी मीटर रिक्षात प्रवास करू इच्छितात, पण रिक्षाचं उपलब्ध नसल्याने त्यांचा हिरमोड होतो, असे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस श्याम उबाळे यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.