मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

सुदर्शन केमिकलतर्फे ‘जीवन कौशल्य’ पुस्तकाचे प्रकाशन
रोहा (बातमीदार) ः आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात तरुणांना योग्य दिशादर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकासाची आवश्यकता ओळखून सुदर्शन केमिकल कंपनीने सामाजिक जबाबदारीचा आदर्श निर्माण केला आहे. द. ग. तटकरे महाविद्यालय, कोलाड येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात कंपनीतर्फे ‘जीवन कौशल्य’ या नावाचे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित करण्यात आले. अन्सार डांगे, पराग फुकणे, अमर चांदणे आणि प्राचार्य तिरमले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे अनावरण झाले. सुदर्शन केमिकलच्या सीएसआर विभागप्रमुख माधुरी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारला असून, पुस्तकामध्ये तर्कशक्ती, संवादकौशल्य, आत्मनुशासन, निर्णयक्षमता, भावनिक संतुलन आणि समस्या निराकरण कौशल्य यांसारख्या आजच्या काळातील अत्यावश्यक गुणांचा अभ्यासपूर्ण समावेश आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना नवी दृष्टी देईल, असे मत अन्सार डांगे यांनी व्यक्त केले. रोहा, महाड आणि सुतारवाडी परिसरातील १५ हून अधिक विद्यालयांमध्ये या उपक्रमाचा लाभ मिळत असून, दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. प्रशिक्षक किशोर काळोखे हे प्रतिमहिना दोन वेळा शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना जीवनकौशल्यांचे थेट प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन देतात.
..............
अनुराज ठाकूरची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड
रोहा (बातमीदार) ः रायगड जिल्हा कुमार गट खो-खो संघाच्या निवडीमध्ये रोहा तालुक्याचा प्रतिभावान खेळाडू अनुराज योगेश ठाकूर (यशवंतखार) याने आपली चमकदार कामगिरी कायम राखत राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. अहिल्यानगर येथे ४ ते ७ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ५१व्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची नामांकनात निवड झाली असून, सानेगाव येथील ओम साई राम संघाचा हा खेळाडू तालुक्याचा अभिमान बनला आहे. अलिबागजवळील हाशिवरे येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अनुराजने उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत रायगड जिल्हा संघात स्थान निश्चित केले. संघाचे प्रशिक्षक विशाल शिंदे यांचे तंत्रज्ञान, फिटनेस प्रशिक्षण आणि प्रेरणेमुळे अनुराजचा खेळ अधिक सुधारला असल्याचे क्रीडा वर्तुळातून सांगण्यात येत आहे. अनुराजच्या निवडीचे ओम साई राम संघ, जय बजरंग क्रीडा मंडळ तसेच सानेगाव-यशवंतखार परिसरात मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले. अध्यक्ष अमर सलागरे यांच्यासह मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही मोठी प्रतिष्ठेची बाब असल्याचे मत क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केले. अनुराजच्या कामगिरीमुळे तालुक्यातील इतर युवकांनाही क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यास प्रेरणा मिळणार आहे.
.................
मेडिकल असोसिएशनची वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात
अलिबाग (वार्ताहर) ः आरोग्यसेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी व्यायाम, क्रीडा आणि संघभावना जोपासावी यासाठी अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धा रविवारी (ता. ३०) कुरूळ येथील आरसीएफ ग्राउंडवर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेले ट्रायथलॉनपटू डॉ. महेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी डॉक्टर ते ॲथलीट या त्यांच्या प्रवासाचा प्रेरणादायी अनुभव उपस्थितांसमोर मांडला. अध्यक्ष डॉ. वैभव भगत यांनी सर्व सदस्यांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देत नियमित व्यायामाची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमात डॉ. दोषी, डॉ. संदेश पाटील, डॉ. गणेश गवळी, डॉ. मयूर कल्याणी यांसह अनेक सदस्य उपस्थित होते. स्पर्धांमध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि कॅरम अशा मैदानी आणि इनडोअर खेळांचा समावेश होता. नियोजनामध्ये डॉ. ओंकार पाटील, डॉ. अमेय केळकर, डॉ. अमित बेनकर आदींनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. सदस्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे या स्पर्धांनी एकात्मता, आरोग्य आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून उत्तम वातावरण निर्माण केले. डॉक्टरांच्या दैनंदिन ताणतणावातून मुक्त करत त्यांना ताजेतवाने करणारा हा उपक्रम पुढील काळातही संस्थेची महत्त्वपूर्ण परंपरा ठरणार आहे.
...............
अंजुमन इस्लाम जंजिरा कॉलेजचे एनएसएस शिबिर
मुरूड (बातमीदार) ः अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरूड–जंजिरा यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित सातदिवसीय विशेष निवासी शिबिराचा समारोप उत्साहात झाला. प्रभारी प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ५० स्वयंसेवकांनी या शिबिरात भाग घेतला. समारोप कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. टी. पी. मोकल, संस्थेचे सचिव हिफझुर्रहमान नझीरी, चेअरमन झैनुद्दीन कादिरी आणि तौसिफ फत्ते आदी उपस्थित होते. शिबिरामुळे विद्यार्थ्यांत समाजभान, शिस्त, नेतृत्वगुण आणि स्वयंसेवक वृत्ती विकसित झाल्याचे डॉ. मोकल यांनी मत व्यक्त केले. शिबिरादरम्यान स्वच्छता मोहीम, पर्यावरण संवर्धन, गावातील जनजागृती उपक्रम, आरोग्य व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी गावाशी विद्यार्थ्यांचे नाते दृढ झाले. संस्थेचे सचिव नझीरी यांनी विद्यार्थ्यांनी या सामाजिक नात्याची सातत्याने जपणूक करावी, अशा शब्दांत प्रेरणादायी संदेश दिला. झैनब खानझादा, अब्दुल रहमान आणि समीर जमकर यांनी त्यांच्या अनुभव कथनातून शिबिरातील शिस्त आणि टीमवर्क याविषयी भावना व्यक्त केल्या.
................
रोहा पोलिसांची अपंग मतदारांना मदत
रोहा (बातमीदार) ः रोहा नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत सर्वत्र शांततेत मतदान सुरू असताना पोलिसांनी अनुकरणीय मानवतेचे दर्शन घडवले. मंगळवारी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी होती. ज्येष्ठ आणि अपंग मतदारांसाठी विशेष सुविधा पुरवण्याची व्यवस्था प्रशासनाने केली होती. मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस सहाय्यक निरीक्षक सूर्या पवार यांनी एका अपंग ज्येष्ठ मतदाराला स्वतःच्या मदतीने मतदानकक्षापर्यंत पोहोचवून मोठे उदाहरण घालून दिले. त्यांच्या या कृतीची उपस्थितांनी प्रशंसा केली. निवडणूक कर्तव्य सांभाळताना दाखवलेली मानवता आणि संवेदनशीलता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. रोहा नगरपालिका निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस दल आणि प्रशासनाने प्रभावी देखरेख, सुरक्षाव्यवस्था आणि शिस्तबद्ध नियोजन केले आहे. नागरिकांनीही शांततेत मतदान करून लोकशाही प्रक्रियेप्रति जागरूकता दाखवली. अशा घटनांमुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
...............
गोंधळपाड्याचा प्रणव पुजारी आयसीएन प्रो शो २०२६ साठी पात्र
अलिबाग (वार्ताहर) ः गोवा येथे झालेल्या आयसीएन इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील तरुण बॉडीबिल्डर प्रणव उमेश पुजारी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत २०२६ च्या प्रतिष्ठित आयसीएन प्रो शोसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशाचे गोंधळपाडा तसेच अलिबाग तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. स्पर्धेत प्रणवने बॉडीबिल्डिंग कॅटॅगिरीत तिसरा क्रमांक, पुरुष फिजिकमध्ये चौथा क्रमांक आणि पुरुष फिटनेस मॉडेल कॅटॅगिरीत सुवर्णपदक पटकावले. तसेच ३० स्पर्धकांमधून प्रो क्वालिफिकेशन राउंडमध्ये तिसरा येण्याचा मान मिळवला. या सर्वांगीण कामगिरीमुळे त्याची आगामी वर्षाच्या आयसीएन शोसाठी निवड निश्चित झाली. प्रणवने अलिबागसह जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून आपली ओळख निर्माण केली आहे. त्याच्या यशामुळे युवकांमध्ये फिटनेस, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व अधिक दृढ होत असल्याचे फिटनेस तज्ज्ञ सांगतात. स्थानिक ग्रामस्थ, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
.....................
श्रमिक विद्यालय चिल्हे येथे संविधान दिवस साजरा
रोहा (बातमीदार) ः नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय, चिल्हे येथे भारतीय संविधानदिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक दीपक जगताप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि नागरिकांच्या कर्तव्यांची जाण ठेवण्याचा संदेश दिला. विद्यार्थिनी आस्था थिटे आणि आराध्या भोईर यांनी संविधानाची निर्मिती, महत्त्व, उद्दिष्टे आणि डॉ. आंबेडकरांचे योगदान याबाबत माहितीपूर्ण सादरीकरण केले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमातून संविधानातील समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांची पुनर्स्मृती घडवण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, लोकशाही मूल्यांप्रति आदर आणि संवैधानिक कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश साध्य झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Nashik Railway : रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती: पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार; पहिल्या टप्प्यात ८,९७० कोटींचा खर्च

Excise Law: सिगारेटसह पान मसाल्याच्या किमती वाढणार! लोकसभेत मोठा निर्णय; हे विधेयक का आणले गेले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शाळा उद्या बंद

Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

Viral Video: 'सनम तेरी कसम...' गाण्यावर डान्स करणाऱ्या नव वधु-वराचा व्हिडिओ तुफान व्हायरल, यूजर्सच्या मजेदार कमेंटचा पाऊस

SCROLL FOR NEXT