पडघा, ता. ३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील जलवाहिनी ते तानसा या मुंबई महापालिकेच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सुमारे ५० गावांतील नागरिकांना विविध स्तरांवर मोठा फटका बसत आहे. यात वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघाताच्या घटनांतही वाढ झाली आहे. याशिवाय, वाहनचालकांमध्ये कंबरदुखी, मणक्याचे त्रासही वाढले आहेत.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या तानसा-मुंबई पाणीपुरवठा वाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी; तसेच आजूबाजूच्या गावांकरीता अनेक वर्षांपूर्वी डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अरुंद रस्त्याची अनेक वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठे खड्डे पडले असून डांबर पूर्णपणे निघून गेले आहे. ठिकठिकाणी दगडगोटे वर आलेले आहेत. दगडगोटे, खड्ड्यांमधूनच वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वारंवार अपघात होत असून काही निरपराध नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. या रस्त्यावरून दररोज ५० गावांतील शेकडो कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध, रुग्ण तसेच वडपा, काल्हेर, कशेळी, पडघा, वाहूली, भोईरपाडा, कुकसे येथील गोदामात काम करणारे कामगार प्रवास करतात. त्यांना दररोज विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.
आरोग्याच्या समस्या
खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांना कंबरदुखी, मणक्याचे त्रास वाढले आहेत. उडणाऱ्या धुळीमुळे श्वसन आणि छातीचे आजार वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
आंदोलने, तक्रारी
हा मार्ग दाभाडमार्गे अंबाडी, कुडूस, वाडा, वज्रेश्वरी, गणेशपुरी, वसई–विरार तसेच मराडे पाडा येथील नव्याने बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असल्याने दळणवळणाच्या दृष्टीनेही अत्यंत आवश्यक आहे. विविध लोकप्रतिनिधींनी रस्ता करण्याची आश्वासने दिली, तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलन, तक्रारी केल्या तरी मुंबई महापालिका प्रशासनात तसूभरही फरक पडलेला नाही. त्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नव्या रस्त्याची मागणी
ब्रिटीशकालीन तानसा वाहिनीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी कवडीमोलाने जमीन दिली होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्त गावांसह परिसरातील सर्व गावांसाठी हा रस्ता नव्याने बनवावा आणि मुंबईसारख्या शहरांमधील पाणीपुरवठा, शिक्षण आणि अद्ययावत आरोग्य सुविधांचा विस्तार येथे करावा, अशीही नागरिकांची मागणी आहे.
परिसरातील दगड खाणी, क्रशरमुळे या रस्त्यावर सतत अवजड वाहनांची वर्दळ असते. ती बंद करून रस्त्याचे सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यात यावे.
- हेमंत पाडेकर, स्थानिक रहिवासी
पडघा : तानसा जलवाहिनी रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.