नेरळमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव
ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा संताप; उपाययोजनेची मागणी
कर्जत, ता. ४ (बातमीदार) ः तालुक्यातील सर्वात मोठी व झपाट्याने शहराकडे वाटचाल करणारी नेरळ ग्रामपंचायत सद्यस्थितीत गंभीर नागरी समस्यांच्या विळख्यात अडकली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी सरपंच व सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली होती. सध्या प्रशासक व ग्रामसेवकाच्या नियंत्रणाखाली कारभार सुरू आहे, मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असल्याने सुविधा पुरवणे ग्रामपंचायतीसाठी आव्हानात्मक झाले आहे.
नेरळमध्ये उंच इमारती, जलद बांधकामे व वाढते नागरीकरण सुरू असतानाच रस्ते-दुरुस्ती, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, नालेसफाई आणि वाहतूक कोंडी या गरजा पूर्ण केल्या जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहराच्या दिशेने उभ्या राहात असलेल्या नेरळला आवश्यक नागरी सोयी न मिळाल्यास नियोजनशून्य वाढ आणि अनागोंदी वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. नेरळ शहरात संघटित पातळीवर प्रयत्नांची कमतरता नागरिकांना सर्वाधिक खटकते आहे. कर्जत शहर बचाव समितीसारख्या नागरी आवाजांच्या तुलनेत नेरळमध्ये नागरिकांना न्याय व मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी कुठलीही ठोस चळवळ नसल्याने नागरिक स्वतःच समस्यांसाठी भटकंती करत आहेत. नालेसफाईचा अभाव, पथदिव्यांचे बिघाड, कचऱ्याचे ढिगारे आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे अनेक वसाहतींचे स्वरूप बदलले आहे. स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास नेरळचे शहरात रूपांतर होण्याऐवजी अस्वच्छ व अराजकतेचे केंद्र बनेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
..............
सक्षम प्रशासकाची गरज
समस्यांचे फोटो तारखेसह ग्रामपंचायतीला दिले आहेत. वॉर्ड क्रमांक ५ मधील अडचणींबाबत लेखी निवेदन दिले असून, अनेक पथदिवे बंद आहेत. नालेसफाईचे नियोजन नाही. छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ तसेच नेरळ–कर्जत महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्यास नेरळची अवस्था अधिकच बकाल होईल. सक्षम प्रशासक नसल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करावी लागेल, असे स्थानिक नागरिक संदीप उतेकर यांनी सांगितले.
.....................
प्रशासनाचे म्हणणे
कर्मचाऱ्यांशी शहानिशा केली असता नमूद केलेल्या समस्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे दिसून आले आहे. दिलेले फोटो आधीच्या काळातील असण्याची शक्यता आहे. तरीही याबाबत पुन्हा माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.