विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास संघर्ष अटळ?
खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) संसदेत गरजले
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची भूमिपुत्रांची मागणी मागील ११ वर्षांपासून प्रलंबित आहे. विमानतळ सुरू होण्याची वेळ जवळ आली असतानाही सरकारकडून नामकरणाबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नाव न दिल्यास संघर्ष टाळता येणार नाही, असा इशारा खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी हिवाळी संसदीय अधिवेशनात दिला.
या मागणीसाठी भूमिपुत्रांनी गेल्या काही वर्षांत अनेक आंदोलने केली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही महिन्यांपूर्वी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्या आश्वासनानंतर कोणतीही पुढील कारवाई न झाल्याने तसेच केंद्र सरकारकडून नामकरणाबाबत अद्याप पुष्टी न मिळाल्याने असंतोष वाढत आहे.
विमानतळाचे उद्घाटन समीप आले असताना सरकारने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे खासदार म्हात्रे यांनी नमूद केले. भूमिपुत्र अंतिम लढ्यास सज्ज असून, नाव न दिल्यास संघर्ष अपरिहार्य ठरेल, असे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले.