डेब्रिज टाकण्यासाठी आलेल्या पाच डम्परवर सिडकोची कारवाई
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) ः उरण तालुक्यातील जांभूळपाडा परिसरातील सिडकोच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतरीत्या डेब्रिज टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच डम्परवर सिडकोच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी संबंधित डम्परचालकांविरोधात उरण पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
जांभूळपाडा येथील सिडकोच्या भूखंडावर आरोग्यास अपायकारक ठरणारी माती व रेबिटयुक्त डेब्रिज टाकण्यासाठी काही डम्पर येत असल्याची माहिती सिडकोच्या निरीक्षक पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (ता. ३) सायंकाळी ५.१५ वाजता सिडकोचे पथक चिरनेर-गव्हाणफाटा रोडवरील एम्पेझर यार्डजवळ पोहोचले असता, डम्परमधून डेब्रिज खाली टाकण्याच्या हालचाली सुरू असल्याचे आढळून आले.
त्यानंतर सिडको पथकाने उरण पोलिसांच्या साहाय्याने सर्व पाच डम्पर जप्त केले. याप्रकरणी चालक सुरेश कदम (४७), अमरसिंह गौतम (२७), कमलेश प्रजापती (४२), अरविंदकुमार गौतम (३१) आणि शिवभोले पुष्पकर (३१) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.