चैत्यभूमीवर विचारांचा महाकुंभ
आंबेडकरी साहित्य विक्रीत नवा ट्रेंड
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून आलेल्या लाखो अनुयायांनी उपस्थिती नोंदवली. श्रद्धा, अभिवादन आणि विचारांचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यात यंदा आंबेडकरी साहित्याच्या खरेदीत अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. स्तूपाला मानवंदना देतानाच बाबासाहेबांचे विचार दैनंदिन आयुष्यात सोबत घेऊन जाण्याची भावना अनुयायांमध्ये प्रकर्षाने जाणवली.
चैत्यभूमी परिसरात उभारलेल्या स्टॉल्सवर बाबासाहेबांच्या विचारांशी संबंधित पुस्तके, फोटो फ्रेम, मूर्ती, दिनदर्शिका, पोस्टर्स तसेच लिखित विचारांचे बॅनर यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेले टी-शर्ट, आधुनिक डिझाइनमधील एलईडी फोटो फ्रेम, तसेच तरुणांना आकर्षित करणाऱ्या ग्राफिक आर्टमधील बाबासाहेबांचे पोर्ट्रेट मोठ्या प्रमाणावर विकले गेले.
विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा पारंपरिक साहित्याबरोबरच ‘आधुनिक बाबासाहेब’ ही संकल्पना अधिक प्रमाणात स्वीकारली जात आहे. तरुण वर्गाने केवळ पुस्तकांपुरते न थांबता टी-शर्ट, कॅप, बॅज, फोन कव्हर, की-चेन यांसारख्या नव्या स्वरूपातील साहित्यांकडे विशेष पसंती दिली. काही स्टॉल्सवर बाबासाहेबांच्या विचारांवरील कोटेशन प्रिंट केलेली उत्पादनेही आकर्षणाचे केंद्र ठरली.
बाबासाहेबांच्या स्वाक्षरीचे टी-शर्ट आकर्षणाचे केंद्र
प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरी असलेले टी-शर्ट बाजारात आल्याने त्यांना मोठी मागणी मिळाली. १२० ते ३५० रुपयांपर्यंत दर असलेल्या या टी-शर्टना विशेष पसंती मिळाली. विशेष म्हणजे, वैयक्तिक खरेदीपेक्षा बल्कमध्ये खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक होती. राज्याबाहेरून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनीही मोठ्या प्रमाणावर टी-शर्टसाठी संपर्क क्रमांक आणि माहिती घेतल्याचे दिसून आले. ही संपूर्ण मागणी प्रामुख्याने बल्क ऑर्डरसाठीच असल्याची माहिती रझा एंटरप्रायझेसने ‘सकाळ’ला दिली.
एलईडी फ्रेमना मोठी पसंती
गॅलेक्सी एंटरप्रायझेस गेल्या अनेक वर्षांपासून प्रिंटिंग व्यवसायात कार्यरत असून, बुद्धिस्ट संस्कृतीशी संबंधित नवनवीन संकल्पना समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा प्रथमच एलईडी फ्रेम बाजारात आणण्यात आल्या आहेत.
५०० ते २,५०० रुपयांपर्यंत किंमत
एलईडी फ्रेमची किंमत ५०० ते २,५०० रुपयांपर्यंत असून, आकर्षक डिझाइन, प्रकाशयोजना आणि सांस्कृतिक प्रतीकांमुळे त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या सुरुवातीपासूनच या फ्रेमला मोठी मागणी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्राहकांकडून मिळणारा उत्साह पाहता, हा उपक्रम यशस्वी ठरत असून, बुद्धिस्ट संस्कृतीशी निगडित आधुनिक आणि दर्जेदार उत्पादने समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील, अशी माहिती गॅलेक्सी एंटरप्रायझेसने ‘सकाळ’ला दिली.
तरुणाईचा वाढता सहभाग
दरवर्षी विक्री वाढते; मात्र यंदा तरुणांची संख्या आणि त्यांचा उत्साह वेगळाच जाणवतो. बाबासाहेबांच्या विचारांना आधुनिक स्वरूपात मांडणाऱ्या वस्तूंना चांगली मागणी आहे, असे एका विक्रेत्याने ‘सकाळ’ला सांगितले. अनेक स्टॉल्सवर दुपारपर्यंत काही साहित्य संपल्याचे चित्रही पाहायला मिळाले.
भक्तीबरोबर विचारांची बांधिलकी
चैत्यभूमीवरील वातावरण भक्तिमय असतानाच सामाजिक जाणिवेचाही जागर होताना दिसत आहे. बाबासाहेबांचे विचार केवळ स्मरणापुरते न राहता दैनंदिन जीवनात आत्मसात करण्याची भावना या साहित्य खरेदीतून स्पष्टपणे जाणवत आहे. नव्या ट्रेंडसोबतच विचारांची जोपासना करणारा हा महापरिनिर्वाण दिन यंदा अधिक अर्थपूर्ण ठरल्याची भावना अनेक अनुयायांनी व्यक्त केली.
बाबासाहेबांची स्वाक्षरी असलेले टी-शर्ट पहिल्यांदाच आणले आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. तरुण वर्गाकडून आणि संघटनांकडून बल्क ऑर्डरची मागणी अधिक आहे.
- ताहीर वारसी, रझा एंटरप्रायझेस
साधे फोटो नव्हे, तर बाबासाहेबांची स्वाक्षरी असलेले टी-शर्ट लोक भावनेने घेत आहेत. यंदा विक्री जलद झाली असून अनेक टी-शर्ट लवकरच संपले.
- रझा भाई, व्यावसायिक, बदलापूर
बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचावेत, या उद्देशाने आम्ही यंदा प्रथमच एलईडी फ्रेम आणल्या. आधुनिक डिझाइन आणि प्रकाश योजनेमुळे तरुण वर्गासह सर्व वयोगटांकडून या फ्रेमना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- संतोष महादेव वर्के, गॅलेक्सी एंटरप्रायझेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.