मनोर, ता. ७ (बातमीदार) : मियावाकी जंगल उभारणीसाठी पालघर तालुक्यातील दहिसर वनपरिक्षेत्रातील दुर्वेस गावात मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या वनविभागाच्या जागेतील लाखो झाडांची कत्तल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गवत असल्याचे दाखवून सावर, साग, करवंद, ऐन, पळस, जांभूळ, हुम, वेहळा, वुक्षीसारख्या विविध स्थानिक प्रजातींची एक लाखापेक्षा अधिकच्या संख्येने असलेल्या जिवंत आणि चार ते पाच फूट उंचीच्या झाडांचा बळी देण्यात आला आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावातील राखीव वन असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक १६७ मधील दोन हेक्टर क्षेत्रात मियावाकी जंगल तयार करण्यासाठी ४४ हजार झाडांची लागवड केली जाणार आहे. मियावाकी जंगल उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून दोन हेक्टर क्षेत्रातील मियावाकी जंगलाला संरक्षक जाळी, ठिबक सिंचन, तसेच अन्य सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
मियावाली जंगल तयार करण्यासाठी प्लॉट निवड करताना दुर्वेस गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीला अंधारात ठेवण्यात आले आहे. कोणाला फायदा पोहोचवण्यासाठी मियावाकी जंगल उभारणीचा घाट घालण्यात आला आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
कुंपणानेच गवत खाण्याचा प्रकार
गवत असल्याचा दावा करून लाखो झाडांची कत्तल करण्याचा घाट वनविभागाकडून घालण्यात आला आहे. ग्रामस्थांनी एक झाड तोडल्यास गुन्हे दाखल करणारा वनविभाग नियमांची पायमल्ली करून वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून लाखो झाडांची कत्तल केली आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
मियावाकी जंगलासाठी प्लॉट निवडणे, तसेच झाडांची तोड करताना गावाच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीला अंधारात ठेवल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष पुंडलिक कडव यांनी केला आहे. झाडांच्या कत्तलीला जबाबदार वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सफाई केल्याचा दावा
गवत आणि वेलींची सफाई करण्यात आली आहे. झाडांची कत्तल झालेली नाही. याठिकाणी झाडांची लागवड करून मियावाकी जंगल उभारणी केली जाणार आहे, असे दहिसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हृषीकेश वाघमारे यांनी सांगितले.
मियावाकी जंगल निर्माण करून ४४ झाडे लावण्यासाठी लाखो झाडांचा बळी देणे योग्य नाही. अस्तित्वात असलेल्या झाडांच्या वाढीसाठी सिंचन, संरक्षक जाळी, तसेच अन्य सुविधा निर्माण केल्या असत्या तर स्थानिक झाडांची वाढ होऊन घनदाट जंगल निर्माण झाले असते. झाडांची कत्तल करणारा ठेकेदार आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे.
- सुनील आतकारी, ग्रामपंचायत सदस्य
मियावाकी जंगल निर्मितीचा निर्णय, तसेच झाडे तोडण्याचा निर्णय घेताना संयुक्त वनव्यवस्थापन समितीला विश्वासात घेण्यात आले नाही.
- पुंडलिक कडव, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष
दुर्वेसच्या जंगल परिसरात श्वापदांचा वावर आहे. मियावाकी जंगल निर्मितीसाठी निवडलेल्या परिसरालगत महामार्गावर एका बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला होता. जंगलातील जैवविविधता टिकवण्यासाठी अभ्यास करून निर्णय घेण्याची गरज असताना अंधाधुंद पद्धतीने जंगलतोड करण्यात आली आहे.
- प्रदीप दळवी, ग्रामपंचायत सदस्य, दुर्वेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.