नालासोपारा, ता. ९ (बातमीदार) : गर्भपाताच्या बेकायदा गोळ्या देणाऱ्या डॉक्टरचा नालासोपाऱ्यात भांडाफोड झाला आहे. वसई-विरार महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्या पथकाने सोमवारी (ता. ८) कारवाई केली आहे. याबाबत संशयित डॉक्टरवर नालासोपाऱ्याच्या पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्याच्याविरोधात लावलेल्या कलमाअंतर्गत सात वर्षांपेक्षा शिक्षा कमी असल्याने डॉक्टरला अटक न करता त्याला नोटीस देऊन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
डॉ. जबिहुल्लाह अब्दुल्लाह खान असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडे बीएएमएस पदवी आहे. नालासोपारा पूर्वेतील धानिवबाग तलावाजवळील गावदेवी रोडवर सिद्धिविनायक चाळीत हा डॉक्टर शाहिना नावाने क्लिनिक उघडून सराव करत होता. या क्लिनिकच्या फलकावर त्याने फॅमिली फिजिशियन आणि सर्जन, पॅथॉलॉजी यावर उपचार केले जातील, असे लिहिले होते. डॉक्टर स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा प्रसूतितज्ज्ञ नसताना, तसेच त्यास गर्भपात करण्याच्या गोळ्या देण्याचा अधिकार नसताना रुग्ण तपासून, त्यांना गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करीत असल्याच्या तक्रारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आल्या होत्या.
पालिकेच्या धानिवबाग येथील नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रा अंतर्गत तक्रारीच्या अनुषंगाने २९ नोव्हेंबर रोजी सकाळी डमी रुग्ण या डॉक्टरकडे पाठविला. त्याने त्याची तपासणी करून, त्याच्या अपत्यांचीसुद्धा विचारणा केली होती. त्यानंतर त्या रुग्ण महिलेला ६ डिसेंबर रोजी पुन्हा बोलावले होते. महिला क्लिनिकमध्ये गेली असता पुन्हा तिची तपासणी केली. मला गर्भपाताच्या गोळ्या पाहिजेत, असे सांगितले असता, या डॉक्टरने संबंधित महिलेकडून दीड हजार रुपये घेऊन तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा गोसावी यांना या प्रकरणाची खात्री पटल्यावर त्यांनी सोमवारी (ता. ८) छापा टाकला असता, हा प्रकार उघड झाला आहे.
आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार वैद्यकीय पथकाने कारवाई केली आहे. विविध औषधसाठा जप्त करून डॉक्टरवर पेल्हार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- डॉ. भक्ती चौधरी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य विभाग, वसई-विरार महापालिका
संशयित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील कलमाअंतर्गत सात वर्षांखालील शिक्षा असल्याने आम्ही त्याला अटक न करता नोटीस देऊन तपास सुरू केला आहे.
- सचिन कांबळे, वरिष्ठ निरीक्षक, पेल्हार पोलिस ठाणे, नालासोपारा