गायमुख घाटाचे काम अर्धवट
ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) ः घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट वाहतूक कोंडीचा घाट म्हणून ओळखला जात आहे. या घाटावर पडलेल्या खड्ड्यांची वारंवार दुरुस्ती करूनही घाटातील कोंडीचे विघ्न संपेनासे झाले आहे. रविवारी (ता. ७) पुन्हा एकदा या घाटामधील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्याकरिता २४ तासांचा ब्लॉक घेऊन पडलेल्या खड्ड्यात डांबर टाकून मास्टिंग करण्यात आले आहे, मात्र काम धीम्या गतीने झाल्याने सुमारे १०० फुटांपर्यंतच खड्डे भरण्याचे काम झाले. उर्वरित कामासाठी पुढील आठवड्यात पुन्हा एकदा वाहतुकीसाठी हा घाट बंद ठेवण्यात येणार आहे.
गुजरात, पालघर आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकरिता घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा आहे, मात्र त्यावर नेहमीच खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असते. यंदाच्या पावसाळ्यात हा घाट खड्ड्यामुळे अनेकदा कोंडीत गेला. त्यामुळे त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेकदा दुरुस्ती करण्यात आली. गेल्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील खड्ड्यात सिमेंट काँक्रीट भरून ते पूर्ण घट्ट होण्याआधीच हा घाट वाहतुकीसाठी खुला केला होता. यामुळे रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. आता रविवारी या खड्ड्यात मास्टिंग पध्दतीने घाटाच्या चढणीवरील खड्डे भरण्यात आले. त्यासाठी २४ तासांकरिता येथील जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद केली होती.
वाहतूक धीम्या गतीने
रविवारी ठरवलेल्या वेळेत घाटाचे पूर्ण खड्डे भरले गेले नसल्याने हे काम आता १२ ते १४ तारखेला पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. सध्या घाटावरून बंद केलेली जड-अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी उर्वरित खड्डे न भरल्याने ती धीम्या गतीने सुरू आहे.