खर्डीकर क्लासेसमध्ये मोफत थॅलेसेमिया तपासणी
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : सामाजिक बांधिलकी जोपासत खर्डीकर क्लासेस आणि रोटरी क्लब ऑफ उल्हासनगर सपना गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि मोफत थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच खर्डीकर क्लासेसच्या शाखेत पार पडले. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. थॅलेसेमिया तपासणीसाठीही मोठ्या संख्येने नागरिकांनी चाचणी करून घेतली, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
रक्तदात्यांना खर्डीकर क्लासेसच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि आत्मविश्वास यशाचा पाया पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. खर्डीकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील खर्डीकर, प्रकल्प अध्यक्ष संकेत खर्डीकर, रोटरी क्लब अध्यक्ष गोर्धन गोलानी आणि सचिव कवेश अहुजा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सामाजिक जाणिवेचा संदेश देत या उपक्रमाद्वारे रोटरी क्लब आणि खर्डीकर क्लासेसने आरोग्यदायी समाजनिर्मितीचा आदर्श ठेवला.
रक्तदान हे महानकार्य आहे. एक व्यक्ती रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. रक्त कोणत्याही कारखान्यात तयार करता येत नाही, त्यामुळे गरजूंसाठी रक्तदाताच एकमेव आधार असतो. अशा नि:स्वार्थ दानामुळे समाजात परस्पर मदत, मानवता आणि सामाजिक बांधिलकीची भावना मजबूत होते. अशा भावना या वेळी डॉ. सुनील खर्डीकर यांनी व्यक्त केल्या.