शहापूर-खोपोली महामार्गाची दयनीय अवस्था
खड्डेमय प्रवासामुळे अपघाताचा धोका; कर्जतकरांमध्ये संताप
कर्जत, ता. ९ (बातमीदार) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-अ (शहापूर ते खोपोली-हाळ) हा नाशिक-पुणे व्हाया रायगडला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग असून, तो शहापूर, मुरबाड, कर्जत व खोपोली या शहरांना जोडतो. तसेच समृद्धी महामार्गाला वळसा घालून जेएनपीएकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे, मात्र सुरुवातीपासूनच या महामार्गाची अवस्था अत्यंत खराब असून, सद्यस्थितीत तेथे खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे.
गेल्या आठ वर्षांपासून नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कळंब, कशेळे, वंजारवाडी पूल, कडाव, चारफाटा परिसरात रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. विशेषतः कशेळे बाजारपेठेतून जाणारा रस्ता ग्रामीण भागातील रस्त्यापेक्षाही वाईट झाल्याचे चित्र आहे. याबाबत अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कर्जत- खोपोलीकडे जाताना पळसदरी मार्गावर हा महामार्ग वर्णे, तळवली, नावंडे, हाळ या गावांतून पुढे जातो, मात्र शेतकऱ्यांना योग्य मोबदला न दिल्याने अनेक ठिकाणी काम रखडले आहे. मोबदला ‘टक्केवारीच्या’ राजकारणात अडकल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आठ वर्षांपासून नागरिकांना या मार्गावरून अर्धा फूट खोल मोठ मोठ्या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही जुना राज्यमार्गदेखील गायब झालेला आहे. जुना रस्ता गेला कुठे, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. काही ठिकाणी जुन्या मार्गावर हळूहळू अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप होत आहेत. जर हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणार नसेल, तर जुना राज्यमार्ग दुरुस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
.........................
कायमस्वरूपी काँक्रीटीकरणाची मागणी
दरवेळी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात खडी व गिट्टी टाकून मलमपट्टी केली जाते, मात्र नागरिकांना आता कायमस्वरूपी काँक्रीटीकरण हवे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभर चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे स्वप्न दाखविले असले, तरी ५४८-अ महामार्ग त्या स्वप्नाला कलंक ठरत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे. या महामार्गाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे आहे, मात्र गेल्या आठ वर्षांत जबाबदारी झटकण्याचा प्रकार चालू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्थानिक कार्यालय नसल्याने तक्रारींसाठी थेट संपर्क करणे अशक्य झाले आहे. मुंबईतील बांद्रा कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने आता कर्जतकर नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.