पेण पोलिसांत अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल
तपास यंत्रणेच्या वेगाला मिळणार नवे बळ
पेण, ता. ९ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि तपास प्रक्रियेला अधिक वैज्ञानिक व गतिमान करण्यासाठी पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी अलीकडेच अनेक आधुनिक पावले उचलली आहेत. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पेण उपविभागीय पोलिस कार्यालयात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. यामुळे गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळीच त्वरित पुरावे गोळा करून त्यांचे प्राथमिक विश्लेषण करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, डिजिटल फॉरेन्सिक किट, जैविक, भौतिक व डिजिटल पुरावे जतन करण्यासाठी विशेष युनिट, तसेच फिंगरप्रिंट, डीएनए, व्हिडिओ फुटेज किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसची तपासणी करण्यासाठी अत्यावश्यक साधनसामग्री उपलब्ध आहे. तपास पथकाला तत्काळ निर्णय घेता यावा, पुराव्यांचा अपव्यय टाळता यावा आणि तपासातील प्रत्येक मिनिट मौल्यवान ठरावा या हेतूने ही व्यवस्था करण्यात आली आहे. या व्हॅनसह कार्य करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित पथक तयार करण्यात आले असून, घटनास्थळी पोहोचताच हे पथक तांत्रिक तपासणी सुरू करू शकते. त्यामुळे पूर्वीपेक्षा तपास अधिक निष्पक्ष, जलद आणि पुराव्याधारित होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक गुन्हे उलगडण्याचा दर वाढण्यासही या सुविधेमुळे मोठी मदत होणार आहे. या नव्या सुविधेचे स्वागत करताना उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल यांनी, घटनास्थळीच वैज्ञानिक तपासणीची सोय झाल्यामुळे तपासाची गुणवत्ता आणि गती दोन्ही वाढतील, असे सांगितले, तर पेण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागूल यांनी, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे आमच्या तपास यंत्रणेला महत्त्वाची बळकटी मिळाली असून, गुन्ह्यातील पुरावे त्वरित व अचूकपणे जतन करण्यास मदत होईल, असे नमूद केले. पेण उपविभागात दाखल झालेली ही व्हॅन आधुनिक गुन्हे तपास प्रक्रियेतील एक महत्त्वाची पायरी ठरणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल अधिक सज्ज व सक्षम होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.