उरणच्या मयंकचा जलतरणात विक्रम
भाऊचा धक्का ते करंजा जेट्टीचे अंतर केले पार
उरण, ता. ९ (वार्ताहर)ः उरणच्या मयंक म्हात्रेने भाऊचा धक्का ते करंजा जेट्टीचे २४ किलोमीटरचे अंतर कापत नवा विक्रम स्थापित केला आहे. यापूर्वी धरमतर ते करंजा, घारापुरी ते करंजा प्रवाह पोहून पार केला आहे. त्यामुळे तीनही प्रवाह पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे.
उरण सेंटमेरीज कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मयंक म्हात्रे याने नवा विक्रम स्थापित केला आहे. भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी यादरम्यानचे २४ किलोमीटरचे अंतर त्याने सात तास २१ मिनिटे सहा सेकंदात पार केले आहे. याआधी धरमतर ते करंजा जेट्टीचे १८ किलोमीटरचे अंतर पोहून पार केले, तर घारापुरी ते करंजा जेट्टी हे १८ किलोमीटरचे अंतर पोहणारा पहिला जलतरणपटू ठरला. सलग तीन वर्षे मयंकने तीनही प्रवाह पार केले आहेत.
--------------
खडतर प्रवास
मयंकने सोमवारी पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांनी भाऊचा धक्का येथून समुद्राच्या लाटांवर झेप घेत नव्या विक्रमाला सुरुवात केली. पहाटेचा काळोख, गार हवा, पाण्याच्या लाटास मोठमोठ्या बोटींचा येणारा अडथळा यातून मार्ग काढताना त्याने निर्धारीत वेळेत अतंर पार केले. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेने त्याच्या विक्रमची नोंद घेतली असून, करंजा ग्रामस्थांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.