नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ११ : उल्हासनगर शहराच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठे नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपमधील सहा माजी नगरसेवकांनी मोठ्या थाटात शिवसेना (शिंदे गट) आणि टीम ओमी कलानीत प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे शहरातील सत्तासमीकरण बदलणार, नेतृत्वात नवी शक्ती निर्माण होणार आणि निवडणुकीतील रणनीतीत उलटफेर होणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, या नव्या राजकीय गणिताला अचानकच ब्रेक लागला असून भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने आणि मंत्री दादा भुसे यांच्या एका विधानामुळे चित्र पालटले आहे.
मंत्री दादा भुसे यांनी अलीकडेच स्पष्ट केले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनुसार, आता एकमेकांचे पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले जाणार नाहीत. तसेच जे माजी नगरसेवक दुसऱ्या पक्षातून आमच्याकडे आले आहेत, त्यांना वेळ पडल्यास येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मूळ पक्षाच्या चिन्हावरूनच लढवावे लागेल, या वक्तव्यानंतर शिंदे गट आणि टीम ओमी कलानीत प्रवेश केलेल्या सर्वच माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण, त्यांना मूळ पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, या निर्णयामुळे त्यांच्या पुढील वाटचालीबाबत संभ्रम आणि गोंधळ वाढला आहे. त्यातच काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या माजी नगरसेवकांची अस्वस्थतता आणखीनच वाढली आहे.
एका बाजूला नव्या पक्षात प्रवेशाचे राजकीय ‘इन्व्हेस्टमेंट’, दुसऱ्या बाजूला ‘मूळ पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक’ ही सक्ती आणि मध्येच आगामी निवडणुकीचे समीकरण सर्वांनी या माजी नगरसेवकांची डोकेदुखी वाढवली आहे. उल्हासनगरच्या राजकीय पटलावर त्यामुळे नवीन तणावाचे सावट पसरले आहे. आता सगळ्यांचे लक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. त्यांच्या निर्णयावरच या सहा माजी नगरसेवकांचे भवितव्य आणि उल्हासनगरमधील आगामी निवडणुकीचे राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे.
========
पक्षांतर प्रवेश
शिंदे गट : किशोर वनवारी, मीना सोंडे
टीम ओमी कलानी : जमनु पुरस्वानी, महेश सुखरामानी, राम (चार्ली) पारवानी, प्रकाश माखिजा
=======
बदललेली परिस्थिती
१) निवडणुकीवेळी कोणत्या पक्षाचे चिन्ह वापरायचे?
२) पोस्टरवर कोणाचा फोटो लावायचा - शिंदे, फडणवीस की ओमी कलानी?
३) मतदारांसमोर आपली राजकीय ओळख कशी सादर करायची?
४) सध्याचे राजकीय गुंतवणूक आणि पद लाभाचा काय परिणाम होणार?
====
उल्हासनगर : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी यांच्या उपस्थितीत भाजपच्या जनमु पुरस्वानी, महेश सुखरामानी, राम (चार्ली ) पारवानी आणि प्रकाश माखीजा यांनी ''दोस्ती का गठबंधन''मध्ये प्रवेश केला
उल्हासनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ओमी कलानी यांच्या उपस्थितीत भाजपाचे किशोर वनवारी आणि मिना सोंडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.