सडवली ग्रामपंचायतीत जलसंधारणाचा उत्साह
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासात्मक उपक्रमांना वेग
पोलादपूर, ता. १० (बातमीदार) ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून सडवली ग्रामपंचायतीत गावविकासाला गती देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामस्थांच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमांनी सामुदायिक एकजूट, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासाची भावना दृढ होत आहे. गावात वनराई बंधारा उभारण्याचे काम आणि स्वच्छता मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करत जलसंधारणासोबतच स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे.
वनराई बंधारा बांधकाम हा गावाच्या भविष्यातील पाणी उपलब्धतेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या बांधकामात ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने सामूहिक शक्तीचे उत्तम उदाहरण दिसून आले. पाण्याचे संवर्धन आणि शाश्वत विकासाचा विचार करत ग्रामविकास कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. गावातील रस्ते, ओढे, सार्वजनिक ठिकाणे आणि शिवार परिसराची स्वच्छता राखण्याचा निर्धार ग्रामस्थांनी उपक्रमादरम्यान व्यक्त केला. स्वच्छतेसोबतच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव गावकऱ्यांच्या कृतीतून प्रकर्षाने जाणवली. गावातील युवक मंडळ, महिला मंडळ, बचत गट, अंगणवाडी आणि आशा सेविका, ग्रामरोजगार सेवक यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या अभियानात सरपंच रोहिणी सुरेंद्र जाधव, उपसरपंच संतोष जाधव, सदस्या शुभांगी मंगेश कदम, सदस्या उषा रमेश जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी मंगेश साळी, ग्रामसेविका त्रिशिला गंभीरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अधिकाऱ्यांसह सर्वच ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे उपक्रम अधिक यशस्वीरीत्या पार पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. सामुदायिक प्रयत्नांतून गावाचा विकास साधता येतो, याची प्रचिती या उपक्रमाने दिली. जलसंधारण, स्वच्छता आणि ग्रामविकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल गावासाठी सकारात्मक बदलाची नांदी ठरत असून आगामी काळात अशाच रचनात्मक उपक्रमांना वेग देण्याची तयारी ग्रामपंचायतीने दर्शविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.