कल्याण-डोंबिवलीत ‘ऊर्जा संवर्धन सप्ताह’
सायकल रॅली, जनजागृती उपक्रम
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली महापालिकेत रविवार (ता. १४) ते रविवार (ता. २१)पर्यंत ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहासाठी पालिकेच्या विद्युत विभागाने विविध जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले आहे. शाळा, महाविद्यालय, रहिवासी सोसायटी, रेल्वे स्थानक, सरकारी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी ऊर्जा बचत, ऊर्जा कार्यक्षमता व सौरऊर्जा वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
या सप्ताहाची सुरुवात सायकल रॅलीने होणार असून याला महापालिका आयुक्त अभिनव गोयल ध्वजांकीत करणार आहेत. विद्युत विभागाने ऊर्जा बचत, ऊर्जा कार्यक्षमता व सौरऊर्जा वापराच्या जनजागृतीकामी विभागाने तयार केलेल्या आकर्षक माहिती फलकाचे अनावरणही आयुक्तांच्या हस्ते होणार आहे. या सायकल रॅलीसाठी २५० जणांनी नोंदणी केली असून त्यांना आकर्षक टी-शर्ट व आकर्षक पदकसुद्धा देण्यात येणार आहे. सायकल रॅली ही कल्याण-डोंबिवली शहरातून मार्गक्रमण करणार असून नागरिकांमध्ये ऊर्जा बचत, ऊर्जा कार्यक्षमता व सौरऊर्जा वापराबाबत जनजागृती करणार असल्याची माहिती महापालिका विद्युत व यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता तथा नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांनी दिली.
विशेष चर्चासत्र
रोटरी भवन येथे सोसायटी इमारतींसाठी शाश्वतता आणि सुरक्षिततेसाठी पालिकेचे पाऊल या चर्चासत्राचे आयोजन केले असून फ, ग, ह प्रभाग क्षेत्रातील रहिवासी संकुल सोसायटीचे पदाधिकाऱ्यांसोबत आयुक्त संवाद साधणार आहेत. या चर्चासत्रात शाश्वतचे पाच विषय मांडण्यात येणार असून कचरा व्यवस्थापन, सौरऊर्जेचा वापर, पावसाचे पाणी साठवणे, सांडपाण्याचा पुनर्वापर, वृक्षारोपण व सुरक्षिततेचे दोन विषय विद्युत सुरक्षा ऑडिट व अग्निसुरक्षेबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती महापालिकेच्या विविध विभागांचे नोडल अधिकारी देणार आहेत.
असा असेल उपक्रम
ऊर्जा संवर्धन सप्ताहामध्ये सोमवारी (ता. १५) सरकारी कार्यालये, मंगळवार (ता. १६), बुधवार (ता. १७) व गुरुवार (ता. १८) शाळा व महाविद्यालय, शुक्रवार (ता. १९) रेल्वे स्थानक, शनिवार (ता. २०) व रविवारी (ता. २१) रहिवासी सोसायटीमध्ये विविध उपक्रम घेणार आहे व महापालिका विद्युत अभियंता यांच्यासाठी ऊर्जा संवर्धन विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत भागवत यांनी दिली आहे.