मुरबाड, ता. १० (बातमीदार) : मुरबाड एसटी स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना रस्ता खणून ठेवल्याने परिसरातील वाहतूक विस्कळित झाली आहे. रस्ता अरुंद झाल्याने समोरासमोर दोन वाहने आल्यास मार्ग देताना मोठी अडचण येते. परिणामी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
तहसीलदार कार्यालयाकडे जाणारा एमआयडीसीकडील हा प्रमुख रस्ता सुमारे महिनाभरापूर्वी खणण्यात आला. मात्र, खोदलेल्या भागावर विटांचा थर घालून दगड-मातीचा भराव करण्याचे काम १५ दिवसांपासून बंद पडले आहे. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध जवळपास चार फूट खोल खड्डा निर्माण झाला असून, अपघाताचा धोका वाढला आहे. परिसरात महावितरण, एमआयडीसी कार्यालय, पेट्रोल पंप, बँका, रुग्णालये यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांची सतत ये-जा असते. खणलेल्या रस्त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे वातावरण प्रदूषित झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मुरबाड औद्योगिक वसाहतीसह सरळगाव मार्गावरील वाहतूकही मोठ्या प्रमाणावर अडथळ्यात येत आहे.
कंत्राटदाराने सुरुवातीला दोन-तीन थर विटा लावल्या असल्या, तरी पुढील काम न करता मजूर गायब झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याच परिसरात वर्षभरापासून मातीचा प्रचंड ढिगारा साठवून ठेवला असून, रस्ता पूर्णपणे विस्कळित झाला आहे. नागरिकांनी तातडीने रस्त्याचे आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
तहसीलदार कार्यालय परिसरात कामानिमित्त ये-जा करावी लागते. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून रस्ता उंच-सखल अवस्थेत आहे. पादचारी आणि चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी.
- अशोक पाटोळे, नागरिक, मुरबाड
मुरबाड : खोदलेल्या रस्त्याचे काम १५ दिवसांपासून बंद आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.