बालविवाहमुक्त पालघरचा निर्धार!
''चाईल्ड हेल्प फाउंडेशन''ची तीन वर्षांपासून जनजागृती मोहीम
वाणगाव, ता.१७ (बातमीदार) : पालघर जिल्हा बालविवाहमुक्त आणि बालकामगारमुक्त व्हावा, या उद्देशाने ''चाईल्ड हेल्प फाउंडेशन'' या सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात व्यापक प्रबोधन मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि आदिवासी आश्रमशाळांमधील सुमारे २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत सामाजिक जाणीव जागृतीचा संदेश पोहोचवण्यात आला आहे.
या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम, स्त्री-पुरुष समानता, लिंग भेदभाव आणि स्त्रीभ्रूणहत्या या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी, कठोर शिक्षा आणि मदतीसाठी आवश्यक असलेल्या चाईल्ड हेल्पलाईन व पोलीस यंत्रणेच्या संपर्क क्रमांकांची माहितीही विद्यार्थ्यांना दिली जात आहे.
संस्थेचे संस्थापक आणि विश्वस्त राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. प्रशिक्षक अण्णाराव वाघमारे यांनी शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून जिल्ह्यात कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मोलाचे कार्य केले आहे. प्रकल्प अधिकारी ज्योती कांबळे यांनी सांगितले की, "जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची विचारधारा बदलण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. जव्हार आणि डहाणू प्रकल्पांतर्गत आजही ही सत्रे सुरू आहेत."
------------------
विशेष कार्यक्रम
शासनानेही सध्या बालविवाह कायद्याच्या जनजागृतीसाठी ''१०० दिवसांचा विशेष कार्यक्रम'' हाती घेतला असून, त्याला संस्थेच्या उपक्रमातून मोठी साथ मिळत आहे. या कार्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.