मुरबाडमध्ये जुगार अड्ड्यावर धडक कारवाई
२२ जणांविरुद्ध गुन्हा; सरळगाव येथे बंद हॉटेलच्या शेडमध्ये जुगार
टोकावडे, ता. २० (बातमीदार) : तालुक्यातील अवैध जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यानुसार मुरबाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. सरळगाव येथील बैलबाजाराजवळ बंद असलेल्या एका हॉटेलच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १९ डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली.
मुरबाड पोलिस ठाण्याला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक दादासाहेब एडके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक साळवे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दीपक हिंदुराव तसेच अन्य पोलिस कर्मचारी सहभागी होते. मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान या ठिकाणी आरोपी जुगार खेळत तसेच इतरांना जुगार खेळवित असल्याचे स्पष्टपणे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी तपास करून जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्ते व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकूण २० हजार ५०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून जुगाराच्या साहित्यासह संपूर्ण पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्व २२ आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास मुरबाड पोलिस करत आहेत. परिसरात अवैध जुगार सुरू असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
...............
पोलिसांचे आवाहन
मुरबाड तालुक्यातील विविध भागांत जुगार, अवैध धंदे तसेच बेकायदा कृत्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे तसेच अवैध जुगार किंवा अन्य गैरकृत्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा कारवायांमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.