कल्याणामध्ये अवतरले देशातील पहिले ‘झिंगव्हर्स’
कला, विज्ञानासह कल्पनाशक्तीचा अनोखा संगम
मुरबाड, ता. २० (वार्ताहर) : मुरबाड, शहापूर तसेच कल्याण ग्रामीण भागातील आबालवृद्धांसाठी मनोरंजन क्षेत्रातील जागतिक दर्जाचा अनुभव आता अगदी जवळच उपलब्ध झाला आहे. कल्याण येथील मेट्रो जंक्शन मॉलमध्ये भारतातील पहिले ‘झिंगव्हर्स’ अर्थात ‘अद्भुत विश्व’ नुकतेच सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडतर्फे साकारलेले हे अद्वितीय मनोरंजन केंद्र तब्बल २५ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण जागेत उभारण्यात आले असून, ते केवळ संग्रहालय न राहता कला, विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा अभिनव संगम ठरत आहे.
विशेष म्हणजे मुरबाडसारख्या आदिवासी व ग्रामीण बहुल भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीच्या दृष्टीने हे ठिकाण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या विविध दालनांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, अवकाश, प्रकाश व ध्वनी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. तसेच कुटुंब, तरुणाई आणि लहान मुले अशा सर्व वयोगटांसाठी ‘झिंगव्हर्स’ हे आकर्षणाचे नवे केंद्र बनले आहे. ‘झिंगव्हर्स’मध्ये प्रवेश करताच अभ्यागतांना एका वेगळ्याच काल्पनिक विश्वात प्रवेश केल्याचा अनुभव येतो. ३६० अंश प्रोजेक्शन असलेले ‘झिंगडम’ हे प्रवेशद्वार अंतराळ सफरीचा थरारक अनुभव देते. ‘झिंगलो’ हे जैविक प्रकाश देणाऱ्या काल्पनिक जंगलासारखे असून, विशेषतः लहान मुले व छायाचित्रणप्रेमींसाठी ते आकर्षण ठरत आहे. याशिवाय ‘झिंगफिनिटी’ या दालनात आरसे व प्रकाशाच्या साहाय्याने अनंत विश्वाचा भास निर्माण करण्यात आला असून, सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्ससाठी हे ठिकाण विशेष लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे.