घाटकोपरमध्ये ८५ हजारांच्या रेशन धान्याचा काळाबाजार
चार जणांवर गुन्हा दाखल
घाटकोपर, ता. २० (बातमीदार) :
घाटकोपर पश्चिमेकडील जागृतीनगर मेट्रोस्थानकाखाली रेशनिंग धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करीत एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी चार जणांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ताराचंद गुप्ता आणि राकेश (पूर्ण नाव अज्ञात) अशी अटक करण्यात आलेल्या आणि संशयित आरोपींची नावे असून, या प्रकरणात आणखी दोन जणांचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. कारवाईदरम्यान रेशनिंग अधिकारी व पोलिसांनी तब्बल ८४ हजार ४०० रुपये किमतीचे रेशन धान्य जप्त केले आहे. याप्रकरणी सहाय्यक शिधावाटप अधिकारी संजय गंगावणे यांनी तक्रार दाखल केली आहे. ‘आईबाबा फाउंडेशन’चे अध्यक्ष योगेश रमेश मौर्य यांनी रेशन धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या १०० क्रमांकावर दिली होती. त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी जागृतीनगर मेट्रो पुलाखाली सापळा रचून, पंतनगर येथून मरोळकडे रेशन धान्य वाहतूक करणारी रिक्षा अडवली.
रिक्षाचालक ताराचंद गुप्ता याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता; मात्र पोलिस ठाण्यातील चौकशीत त्याने हे धान्य मरोळ येथील राकेश व त्याच्या सहकाऱ्यांना देणार असल्याची कबुली दिली. माल पोहोचवल्यानंतर त्याला भाडे देण्यात येणार होते, अशी माहितीही त्याने दिली. या कारवाईत तक्रारदार योगेश मौर्य, रेशनिंग अधिकारी संजय गंगावणे यांच्यासह विलास घुले, अजय बोऱ्हाडे, सागर सोनवणे, कांतीलाल गीते, अजित आटे, प्रदीप इंगळे व राजेंद्र पाटील सहभागी होते.
जप्त करण्यात आलेल्या धान्यात विविध ब्रँडच्या तांदळाच्या व डाळींच्या गोणी असून, त्यामध्ये महाराजा तूर डाळ, बिगूल वाटाणा ॲपल ब्रँड, अनमोल मसूर डाळ, स्वाद चना रेशन, ऑर्डनिक राइस, एम. आर. ग्रुप, मुरली मटार तसेच क्रमांक ४८७६ लिहिलेली तांदळाची गोणी यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास घाटकोपर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन भगत करीत असून, एमएच-०३-सीजी-२४६५ क्रमांकाची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.