क्षयरोग रुग्णांना कडधान्यांचे वाटप
रोटरी क्लब ऑफ बोईसर-तारापूरचा उपक्रम
तारापूर, ता. २० (बातमीदार) : रोटरी क्लब ऑफ बोईसर-तारापूर यांच्या वतीने क्षयरोग रुग्णांसाठी बोईसरमध्ये उच्च-आहार युक्त कडधान्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक महिन्याला रोटरी कलबकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत शनिवारी बोईसर येथील राम मंदिरमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.
क्लब संचालक राम नारायण गोयल, डॉ. पराग कुलकर्णी व विनायक पद्मवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. क्षयरोग हा दीर्घकालीन उपचारांची गरज असलेला आजार असून या काळात रुग्णांना दीर्घकाळ औषधोपचार करावे लागतात. अशा परिस्थितीत औषधांसह पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक असल्याने रोटरी क्लब बोईसर यांच्या कडून रुग्णांना मोफत कडधान्यांचे वाटप केले जाते. हा उपक्रम भागेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड, डॉ. दिगंबर झावर, मारुती रघुनाथ कदम, राकेश अच्युत यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.