मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
- अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदांचे आज निकाल
- कोण उधळणार विजयाचा गुलाल?
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० ः गेल्या महिनाभरापासून ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदांचा निवडणूक निकाल उद्या (ता. २१) लागणार आहे. या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत आहे. या दोन नगर परिषदांच्या निकालांवर जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांचे गणित ठरणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही सभा झाल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार, कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार आणि विजयाचा गुलाल कोण उधळणार, हे उद्याच्या निकालाने स्पष्ट होणार आहे.
मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागला आहे. १५ जानेवारीला एकाच दिवशी या सर्व महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र या निवडणुकांची रंगीत तालीम नगर परिषद निवडणुकांपासून सुरू झाली होती. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदांचाही समावेश आहे. या दोन्ही नगर परिषदांसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या महायुतीतील मित्रपक्षांनी स्वबळाचा नारा देत निवडणुका लढवल्या आहेत. जिल्ह्यात ताकद कुणाची हे अजमावण्याची ही संधी असल्याने प्रचार शिंगेला पोहोचला होता. आता या दोन्ही पक्षांमध्ये महापालिकांसाठी महायुती झाली असल्याची घोषणा झाली असली तरी अंबरनाथ, बदलापूरमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे.
अंबरनाथ नगर परिषद निवडणूक २० दिवस पुढे गेल्याने आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या पाच जागांचे मतदान स्थगित झाल्याने २० डिसेंबरला या दोन्ही नगर परिषदांसाठीचे मतदान झाले. यासाठी सुमारे महिनाभरापासून या दोन्ही शहरांमध्ये प्रचाराचा धुरळा उडाला होता. पक्षांचे प्रमुख नेते हजेरी लावत होते. या सर्वांमध्ये महाविकास आघाडी कुठेच दिसली नाही. उलट आयत्यावेळी मनसेचे उमेदवार ठाकरे गटात, ठाकरे गटाच्या उमेदवारांचे भाजपला समर्थन असे नाट्य घडत राहिले. राजकीय पक्षांचा उत्साह शिंगेला होता. विशेष म्हणजे बदलापूर आणि अंबरनाथ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन भाजपमध्ये उत्साह वाढवला. प्रस्थापितांना धडा शिकवण्याचे आव्हान त्यांनी केले. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही सभा घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांना बळ दिले होते.
-----
कुठे अन् कशी लढत?
अंबरनाथ
एकूण पॅनेल - २९
नगरसेवक पदे - ५९
नगराध्यक्ष - १
उमेदवार -
नगराध्यक्ष पदासाठी - ८, नगरसेवक पदासाठी- २५९
२०१५ निवडणुकीचे बलाबल
एकूण जागा- ५७
शिवसेना - २९
भाजप - ९
राष्ट्रवादी - ४
काँग्रेस - ११
इतर - ७
नगराध्यक्ष - शिवसेना
---------------------
बदलापूर
एकूण पॅनेल - २४
नगरसेवक पदे - ४९
नगराध्यक्ष - १
उमेदवार
नगराध्यक्ष पदासाठी - ५, नगरसेवक पदासाठी - १४१
२०१५ निवडणुकीचे बलाबल
एकूण जागा - ४७
शिवसेना - २४
भाजप - २०
राष्ट्रवादी - २
इतर - १
नगराध्यक्ष - शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.