मतमोजणीसाठी यंत्रा सज्ज
रायगड जिल्ह्यातील १० नगर परिषदांचा आज निकाल
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २० : रायगड जिल्ह्यातील १० नगर परिषदांसाठी रविवारी (ता. २१) मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी २८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी ८३ टेबल लावण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील १० नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ३४, तर २०७ नगरसेवक पदांसाठी ५७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या १० नगर परिषदांसाठी २ डिसेंबरला मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यानंतर दुसऱ्याच दिवसी मतमोजणी होणार होती; परंतु न्यायालयाने ऐन वेळेला २१ डिसेंबरला मतमोजणी घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे ही मतमोजणी रविवारी होत आहे. मतदानानंतर सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून त्या कक्षात मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.