दोन्ही राष्ट्रवादी वसईत वाऱ्यावर
विरार, ता.२४ (बातमीदार)ः वसईमध्ये राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. एकीकडे महायुती, महाविकास आघाडीत जागावाटपांच्या चर्चा रंगल्या असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र एकाकी पडल्याचे चित्र आहे.
महायुतीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा देण्याऐवजी राष्ट्रवादीचा उमेदवार पळवला आहे. तर महाविकास आघाडीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाऱ्यावर सोडले आहे. वसईत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नाही. त्यांचा एकही नगरसवेक नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आहे. परंतु, महायुतीच्या शिवसेना (शिंदे), भाजप यांनी राष्ट्रवादीला एकदाही बैठकीला बोलावले नाही. अपमान सहन करून राष्ट्रवादीने महायुतीकडे सन्मानजनक जागा मागितल्या होत्या. यासाठी राष्ट्रवादीने काही उमेदवारांची यादी भाजपकडे दिली होती. मात्र, जागा देणे दूरच, उलट राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र लोखंडे यांनाच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.