पिंगळसईचे जंगल वणव्याने होरपळले
वनसंपत्तीचे मोठे नुकसान; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप
रोहा, ता. २४ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील पिंगळसई परिसरात मागील दोन-तीन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण वणव्यामुळे संपूर्ण जंगल अक्षरशः होरपळून निघाले आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा, झुडपे, गवत तसेच जैवविविधतेची प्रचंड हानी झाली असून, परिसरात काळा धूर, जळालेल्या झाडांचे अवशेष आणि राखेचे ढीग पाहायला मिळत आहेत. या घटनेमुळे पिंगळसई परिसरातील निसर्गसंपत्तीला मोठा फटका बसला आहे.
रोहा सामाजिक वनीकरण विभागामार्फत ‘शून्य वणवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच काही समाजकंटकांकडून मुद्दाम वणवे लावले जात असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला तालुक्यातील विविध जंगल भागांमध्ये अशा प्रकारचे वणवे लावले जात असल्याने जंगलसंपत्तीचे अपरिमित नुकसान होत आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात येत आहे. वणव्यांमुळे केवळ झाडेझुडपे खाक होत नाहीत, तर जंगलात वास्तव्यास असणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी यांचा निवारा नष्ट होतो. अनेक जीव जळून मृत्युमुखी पडत असल्याची शक्यता असून उरलेले प्राणी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. पिंगळसई येथे लागलेल्या वणव्यामुळे झालेल्या प्रचंड हानीमुळे पर्यावरणप्रेमी नागरिक, निसर्ग अभ्यासक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी करण्यात येत असून, वणव्याचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वणवे लावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
................
प्रशासनाकडून कारवाईचे संकेत
वणवे लावण्याचे दुर्दैवी प्रकार सातत्याने घडत असून, यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे. असे प्रकार थांबणे अत्यंत गरजेचे आहे. वणवे रोखण्यासाठी रोहा वन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार असून, त्यासोबतच गावागावात जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे वन विभाग अधिकारी सचिन ठाकूर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.