सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : गेल्या निवडणुकीवेळी महापालिकेत पती-पत्नी नगरसेवकांची जोडपी मोठ्या प्रमाणात निवडून आली होती. बऱ्याच जोडप्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी अगदी दोन टर्म पूर्ण केली आहेत. महापालिकेची पहिल्यांदाच पॅनेल पद्धतीने निवडणूक होत आहे. यात अनेक प्रभागात जातीय समीकरणांमुळे विविध आरक्षणे पडली आहेत. त्यावर स्वतःची आई, भावजय, पत्नी, मुलगी आणि मुलाच्या पदरात उमेदवारी पाडण्यासाठी अनेक माजी नगरसेवक सध्या बड्या नेत्यांची मनधरणी करताना दिसत आहेत.
गेल्या वेळी नवी मुंबई महापालिकेतील १११ नगरसेवकांपैकी तब्बल १३ घरातून नवरा-बायको आणि जावा, भावजय आणि काकी-पुतणी असे लोकप्रतिनिधी निवडून आले. १९९५ मध्ये नवी मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक झाली. नवरा -बायको नगरसेवक निवडून येण्याची प्रथा अगदी तेव्हापासूनच सुरू झाली आहे. थेट ग्रामपंचायतीमधून महापालिका होण्याचा बहुधा नवी मुंबई राज्यातील पहिली महापालिका आहे. त्यामुळे गावाच्या राजकारणात ग्रामपंचायत स्तरावर असणारे नेते पुढे महापालिकेच्या काळात नगरसेवक झाले. यादरम्यान शहरात बाहेरून राहायला आलेल्या नेत्यांनीही स्वतःचे वलय तयार करून महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले.
बदलत्या आरक्षणामुळे एक टर्म कधी नवरा, तर कधी बायको असे नगरसेवक म्हणून आळीपाळीने निवडून आले आहेत, मात्र २०१५ ला झालेल्या निवडणुकीत दिघ्यापासून ते बेलापूरपर्यंतच्या नोडमध्ये अनेक ठिकाणी एकाच घरातील दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार लोकांनी निवडून दिले आहे. गेले २५ वर्षे नवी मुंबईत हीच प्रथा सुरू असल्यामुळे पक्ष वाढवण्यासाठी दिवसरात्र झटणारा कार्यकर्ता फक्त खांद्यावर झेंडा घेऊन आणि बॅनर लावण्यापर्यंत मर्यादित राहिला आहे. यंदाच्या निवडणुकीत निवडून येण्याची पात्रता उमेदवारी वाटप करताना ठरवली, तर पुन्हा माजी नगरसेवकांच्या घरातच एक अथवा त्यापेक्षा अधिक उमेदवारी जाणार आहे.
पक्षांना नुकसान होण्याची शक्यता
राजकारणात वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर नेहमी त्यांच्या विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप केला, परंतु विरोधकांनीही महापालिका निवडणुकीत आपल्याच घरातील सदस्यांना पुढे करून तोच कित्ता गिरवला. सध्या शिवसेनेच्या शिंदे गटातही अशाच प्रकारची रस्सीखेच सुरू असल्याचे समजते आहे. ऐरोलीतील काही नेते मंडळी तब्बल सात नगरसेवकांच्या जागा पक्षाकडे मागत आहेत. कोपरखैरणे, घणसोली, वाशी, तुर्भे, सानपाडा व नेरूळ या ठिकाणचे नगरसेवकही आपल्या घरातील सदस्यांसाठी मागणी करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला पोषक वातावरण असतानाही मोठे नुकसान करून घेतील, अशी शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.
गेल्या निवडणुकीत जे नगरसेवक निवडून आले आहेत, अशा जागांवर उमेदवारी मागितली जात आहे. कोणी कितीही जागा मागू शकतात. त्याला कोणी थांबवू शकत नाही, मात्र उमेदवारी देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.
- द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई जिल्हाप्रमुख, शिवसेना, ठाकरे गट
२०१५ मधील पती-पत्नी नगरसेवक
- नवीन गवते (पती), अपर्णा गवते (पत्नी), दिपा गवते
- सुधाकर सोनवणे (पती), रंजना सोनवणे (पत्नी)
- अनंत सुतार (पती), शशिकला सुतार (पत्नी)
- एम. के. मढवी (पती), विनया मढवी (पत्नी), करण मढवी (मुलगा)
- प्रशांत पाटील (पती), सुवर्णा पाटील (पत्नी), कमल पाटील (आई)
- शिवराम पाटील (पती), अनिता पाटील (पत्नी)
- सोमनाथ वास्कर (पती), कोमल वास्कर (पत्नी)
- सूरज पाटील (पती), सुजाता पाटील (पत्नी)
- अशोक गावढे (वडील), सपना गावढे (मुलगी)
- सुरेश कुलकर्णी (पती), राधा कुलकर्णी (पत्नी)
- विजय चौगुले (वडील), ममित चौगुले (मुलगा)
- शुभांगी पाटील, शशिकला पाटील (काकी)
- रुपाली निशांत भगत, वैजयंती दशरथ भगत, फशीबाई भगत (भावजय)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.