निवडणूक खर्चावर कडक नजर
आयोगाकडून ११ लाखांची मर्यादा; बाजारभावाशी मात्र विसंगती
पनवेल, ता. २४ (बातमीदार) : पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या खर्चाबाबत प्रशासनाने अधिकृत दरपत्रक जाहीर केले असून, एका उमेदवारासाठी ११ लाख रुपयांची खर्चमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र ऑडिट पथक स्थापन करण्यात आले असून, उमेदवारांना दररोजच्या खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रचारादरम्यान होणाऱ्या चहा, नाश्ता, जेवण, पाणी, बॅनर, पॅम्प्लेट, ध्वज, भोंगा, हार-फुले इत्यादी खर्चांसाठी ठरावीक दर निश्चित करण्यात आले आहेत. मागील निवडणुकांमध्ये चहा-नाश्ता व जेवणाचा खर्च ‘इतर खर्च’ म्हणून दाखवला जात होता; मात्र या वेळी प्रत्येक सभेचा फोटो, बिल आणि यादीसह सविस्तर अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने जाहीर केलेले दर बाजारभावापेक्षा खूपच कमी असल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आजच्या घडीला हॉटेलमध्ये साधी शाकाहारी थाळी १३० ते १५० रुपयांपर्यंत असताना, दरपत्रकात जेवण थाळीसाठी केवळ १०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. हॉटेलवर जेवायला यायलाच लागते, पण १०० रुपयांत कसे, असा सवाल उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. यंदा अधिकृत खर्चमर्यादा ११ लाख असली तरी प्रत्यक्षात एका उमेदवाराला किमान ५० लाखांहून अधिक खर्च करावा लागेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. विशेषतः प्रभाग पद्धतीची निवडणूक म्हणजेच ‘अर्धी विधानसभा’ असल्याने उमेदवारांसह पक्षांचाही मोठा आर्थिक डाव आखला जात आहे. कागदोपत्री नियम आणि वास्तवातील महागाई यातील तफावत ही यंदाच्या निवडणुकीतील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. प्रभाग पद्धतीची निवडणूक असल्याने एका प्रभागात दोन ते तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उमेदवारांसोबतच पक्षांकडूनही मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची शक्यता आहे.
.........
असे आहेत दर (प्रति युनिट रुपयांत)
चहा, कॉफी १०, दूध २०, नाष्टा प्लेट (पोहे, उपमा) २०, वडापाव १५, भजे २०, साबुदाणा खिचडी २०, पाणी बाटली (५०० मिली) ८, पाणी बाटली (१ लिटर) १५, जेवण थाळी १००, नॉनव्हेज थाळी (चिकन) १५०, नॉनव्हेज थाळी (मटण) २००, कोल्ड ड्रिंक (५०० मिली) ३०, कापडी बॅनर २५ रुपये प्रति चौरस फूट, ध्वज २० प्रति चौरस फूट, पॅम्प्लेट (१,००० प्रति) २०० ते ६००, फेटा ५० ते १०० रुपये, भोंगा ६०० रुपये प्रतिदिन, हार ५० ते २०० रुपये, फटाके ७० ते १,८००, गुलाब हार ५०० रुपये, हॉटेल भाडे १,००० ते ८,५०० रुपये.
..............
बाजारभाव काय सांगतो?
सध्या साधी शाकाहारी थाळी १३०-१५० रुपये, तर नॉनव्हेज जेवण ३०० रुपयांपर्यंत जाते. अशा परिस्थितीत १०० रुपयांत जेवण कुठे मिळते, हा प्रश्न उमेदवारांसह सर्वसामान्यांनाही पडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.