रुग्णाची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा
कल्याणमधील रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना कल्याणमधील ‘एएमपीएम हॉस्पिटल’मध्ये उघडकीस आली आहे. येथे एका रुग्णाची तोतया डॉक्टरमार्फत तपासणी करून त्याला अनावश्यक शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विम्याच्या पैशांच्या हव्यासापोटी रुग्णाची दिशाभूल करणे आणि दुसऱ्या डॉक्टरच्या नावाखाली तपासणी केल्याच्या आरोपाखाली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाडचे रहिवासी गणेश बाबूसिंग राठोड (वय ६१) नाकाच्या त्रासामुळे ईएनटीतज्ज्ञ डॉ. सूरज नायर यांना भेटण्यासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेथील काही कर्मचाऱ्यांनी संगनमत करून डॉ. सूरज नायर यांच्याऐवजी डॉ. अमित मालठाणे यांना मूळ डॉक्टर म्हणून समोर आणले, असा आरोप पीडित रुग्णाने केला आहे. त्या व्यक्तीने मोबाईलच्या टॉर्चने नाकाची तपासणी केली. तसेच शस्त्रक्रियेची भीती दाखवून हजारो रुपयांच्या विविध चाचण्या लिहून दिल्या.
मानसिक धक्का
धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा रुग्ण शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तेव्हा मूळ डॉक्टर सूरज नायर तपासणीसाठी आले. त्यांनी सांगितले की, तुम्हाला कोणत्याही
शस्त्रक्रियेची गरज नाही, फक्त औषधांनी आराम पडेल. ज्या व्यक्तीने आधी तपासणी करून घाबरवले होते, ते डॉ. सूरज नायर नव्हतेच, हे समजताच रुग्णाला मोठा मानसिक धक्का बसला.
तक्रार दाखल
पीडित रुग्णाने तक्रारीत म्हटले आहे की, हॉस्पिटल प्रशासनाचा डोळा त्याच्या एक लाख रुपयांच्या मेडिक्लेमवर होता. ‘कॅशलेस’ सुविधेच्या नावाखाली केवळ हजारो रुपयांच्या अनावश्यक चाचण्याच केल्या नाहीत, तर १५ हजार रुपये अतिरिक्त ‘नॉन-मेडिकल चार्जेस’ म्हणूनही मागितले. गणेश राठोड यांनी या फसवणुकीविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात डॉ. अमित मालठाणे, डॉ. प्रेरणा मालठाणे आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.