अंबरनाथमध्ये तरुणाची कोट्यवधींची फसवणूक
अंबरनाथ, ता. २४ (वार्ताहर) ः नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवून तरुणांच्या कागदपत्रांचा गैरवापर करीत त्यांच्या नावे बनावट कंपन्या आणि बँक खाती उघडून तब्बल ४२ कोटी ९१ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी सलमा सय्यद आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमर रतिराम जैसवारने (वय २७) दिलेल्या तक्रारीनुसार, जुलै २०२४ पासून सलमा सय्यद आणि तिच्या साथीदारांनी त्याला चांगल्या पगाराच्या नोकरीचे प्रलोभन दाखवले होते. नोकरीसाठी पगाराचे खाते उघडायचे असल्याचे सांगून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो मिळवले. मात्र नोकरी देण्याऐवजी त्यांनी कागदपत्रांचा गैरवापर करीत फिर्यादींच्या बनावट सह्या केल्या आणि त्यांच्या नावावर ‘जलज्योती एंटरप्रायझेस’ नावाची कंपनी स्थापन केली.
हा फसवणुकीचा प्रकार इतक्यावरच थांबला नाही, तर संशयितांनी या बनावट कंपनीच्या नावाने दोन बँकांत खाती उघडली. या खात्यांमधून अनुक्रमे सात कोटी नऊ लाख आणि ३५ कोटी ८२ लाख असे एकूण ४२ कोटी ९१ लाख ३१ हजार २२० रुपयांचे प्रचंड आर्थिक व्यवहार करण्यात आले. आपल्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे आणि बनावट कंपन्या उघडल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली. या प्रकारामुळे तरुणांची सामाजिक प्रतिष्ठा मलिन झाली असून, शासनाचा मोठा कर बुडवून ही फसवणूक करण्यात आली असल्याचे आरोप केले. पोलिस उपनिरीक्षक राजनंदिनी पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.