अंबरनाथच्या रस्त्यांवर ‘नोटांचा पाऊस’
खोट्या नोटांमुळे चालकांचा संभ्रम, अपघाताचा धोका
अंबरनाथ, ता. २७ (वार्ताहर) ः अंबरनाथ पूर्व परिसरातील रस्त्यांवर शुक्रवारी (ता. २६) अचानक ‘नोटांचा पाऊस’ पडल्याचे पाहायला मिळाले. पालेगाव रोडपासून ते हुतात्मा चौक आणि उड्डाणपुलापर्यंत ५० रुपयांच्या नोटांचा खच पडल्याने नागरिकांची मोठी झुंबड उडाली; मात्र या नोटा जवळ जाऊन पाहिल्यावर त्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला; मात्र या खोट्या नोट्या उचलण्यासाठी रस्त्यात वाहने थांबवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.
रस्त्यावर पडलेल्या या ५० रुपयांच्या नोटांवर ‘भारतीय मनोरंजन बँक’ आणि ‘फुल ऑफ फन’ असे छापलेले आहे. लांबून पाहताना या नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसत असल्याने दुचाकीचालक आणि पादचारी त्या उचलण्यासाठी भररस्त्यात थांबत आहेत. विशेषतः उड्डाणपुलावर वेगवान वाहतूक सुरू असताना अचानक ब्रेक लावले जात असल्याने मागून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची भीती वर्तवली जात आहे. केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर रस्त्याकडेचे दुकानदारही या नोटा उचलण्यासाठी रस्त्यावर धाव घेत आहेत. उड्डाणपूल, मटका चौक आणि खेर सेक्शन या वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संशयाचे पीक
अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या काळात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे अचानक रस्त्यावर नोटांचा खच पडलेला पाहून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. या नोटा कोणी आणि कोणत्या उद्देशाने फेकल्या, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रशासनाकडे मागणी
नोटा उचलल्यानंतर त्या खोट्या असल्याचे लक्षात येताच नागरिक त्या फेकून देत आहेत; मात्र यामुळे रस्त्यावर कचरा आणि नागरिकांमध्ये संभ्रम वाढत आहे. प्रशासनाने या नोटा तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करावी आणि हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी अंबरनाथकर करत आहेत.