ठाण्यात भाजपचा ‘नमो ठाणे’चा नारा
बॅनर्समुळे युतीच्या चर्चेत मिठाचा खडा?
ठाणे, ता. २७ : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही; मात्र शहरात शनिवारी (ता. २७) झळकलेल्या एका बॅनरने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये लागलेल्या या बॅनर्सवर ‘नमो भारत, नमो ठाणे’ असा मजकूर असून, त्यावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कमळाचे चिन्ह दिसत आहे. यामुळे भाजपने ठाण्यात ‘एकला चलो रे’ची तयारी सुरू केली आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
जागावाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात दोन बैठका पार पडल्या; मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असतानाही शिंदे गटाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. याच पार्श्वभूमीवर तीन हात नाका यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी लागलेले हे बॅनर्स युती तुटण्याचे संकेत तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बॅनर्सवर पंतप्रधान मोदींच्या फोटोव्यतिरिक्त महायुतीतील इतर कोणत्याही नेत्याचा (उपमुख्यमंत्री शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार) फोटो नाही. ‘नमो ठाणे’च्या माध्यमातून भाजपने आपली स्वतंत्र ताकद अजमावण्याचे संकेत दिले आहेत.
अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाही युती जाहीर न झाल्याने, भाजपने प्रचारात आघाडी घेण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ठाण्याचे राजकीय मैदान सध्या या बॅनरबाजीमुळे चांगलेच तापले असून, आगामी २४ तास युती होणार की भाजप ‘स्वबळावर’ मैदानात उतरणार, हे ठरवण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
दोन्ही परिस्थितींसाठी आम्ही तयार!
युतीबाबत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला आम्ही पक्षश्रेष्ठींना आणि प्रदेशाध्यक्षांना सादर केला आहे. आम्ही उद्यापर्यंतचा वेळ दिला असून निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत. आम्ही युती किंवा स्वबळ, अशा दोन्ही परिस्थितींसाठी सज्ज आहोत, असे केळकर यांनी ठामपणे सांगितले.