मुरबाडच्या म्हसोबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज
पाणी, वीज आणि आरोग्य यंत्रणा सतर्क
मुरबाड, ता. २७ (वार्ताहर) : मुरबाडची ओळख असलेल्या आणि तब्बल २२६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या म्हसोबा यात्रेसाठी प्रशासन पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहे. ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सर्व विभागांची संयुक्त बैठक घेत सविस्तर ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध विभागांना लेखी आदेश देऊन कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
यात्रेत भाविकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा विभागाने परिसरातील विहिरी आणि बोअरवेलची साफसफाई करून दुरुस्ती केली आहे. भाविकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या कालावधीत वीजपुरवठा खंडित होऊ नये आणि दिवाबत्तीची व्यवस्था चोख राहावी, यासाठी महावितरणने विशेष पथके तैनात केली आहेत. भाविकांच्या वाहतुकीसाठी मुरबाड बस आगाराने जादा बस सोडण्याचे नियोजन केले असून, बस सुस्थितीत ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. यात्रेत तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी आरोग्य विभाग सतर्क करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले आहे.
तहसीलदारांचा पुढाकार
तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सर्व खात्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे यंदाची यात्रा अधिक शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नवसाला पावणारा देव म्हणून ओळख असलेल्या म्हसोबाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक मुरबाडमध्ये हजेरी लावतात, त्यादृष्टीने यंदा विशेष काळजी घेतली जात आहे.