महापालिका निवडणुकीत शाईची जागा मार्कर घेणार
मतदानाचा हक्क बजावणाऱ्या बोटावर होणार टिक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ ः ठाणे महापलिका निवडणूक विभागाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीत व भयमुक्त वातवरणात पार पडावी, यासाठी कंबर कसली आहे. अशातच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावण्यात येत असते. त्यानुसार ठाणे पालिकेतील ३३ प्रभागातील प्रत्येक मतदान केंद्रावर दोन या प्रमाणे सुमारे दोन हजार १३ मतदान केंद्रासह पाच टक्के राखीव असे धरून चार हजार पाचशेच्या आसपास मार्कर पेन्सची जुळवाजुळाव सुरु असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शाईची जागा मार्कर पेन घेणार असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे पालिकेच्या निवडणुकीची धूम सुरु झाली आहे. इच्छुक व संभाव्य उमेदवारांकडून निवडणूक लढविण्यासाठी दाखल करण्यात येणारे नामनिर्देशपत्र घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे पालिका प्रशासनाने देखील मतदारांची गैरसोय होवू नये, आणि निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी कंबर कसली आहे.
ठाणे पालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ठाणे पालिका क्षेत्रातील ३३ प्रभाग असून १६ लाख ४९ हजार ८६७ इतके मतदार आहेत. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी दोन हजार १३ मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात आले आहे. यामध्ये महापालिका शाळा, पालिकेच्या मालकीच्या वास्तू आणि मैदानात मतदान केंद्र असणार आहेत. अशातच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आवश्यक असलेल्या साधनसामुग्रीत शाईला विशेष महत्व आहे. मतदान केलेल्या मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटावर शाई लावण्यात येत असते. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविणाऱ्या मतदारांच्या बोटाला शाई लावण्यात आली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होवू घातलेल्या निवडणुकीत शाईची जागा मार्कर पेनने घेतली आहे.
ठाणे पालिकेच्या ३३ प्रभागातील १३१ उमेदवारांसाठी निवडणुकी पार पडणार आहे. यासाठी दोन हजार १३ मतदान केंद्र सज्ज ठेवण्यात येणार आहे. या केंद्रावर प्रत्येकी दोन याप्रमाणे मार्कर पेनचे नियोजन करण्यात आले असून दोन हजार १३ मतदान केंद्रासाठी चार हजार ३६ तर, पाच टक्के राखीव असे चार हजार ५०० च्या आसपास मार्कर पेन्सची जुळवाजुळाव सुरु असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
अशी आहे पद्धत
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलिंग ऑफिसर) मतदाराच्या डाव्या बोटावर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताचे बोट नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.