तानसा अभयारण्यात अवजड वाहनांची सर्रास घुसखोरी
प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल
वाडा, ता. २७ (बातमीदार) : तानसा अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रातून जाणाऱ्या कांबारे–वाशिंद मार्गावर अवजड व अतिअवजड वाहनांची खुलेआम वाहतूक सुरू असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा संपूर्ण मार्ग तानसा अभयारण्यात मोडत असल्यामुळे येथून अवजड वाहनांच्या वाहतुकीस सक्त बंदी आहे. यासाठी वनखात्याने दोन ठिकाणी चौक्या उभारल्या असतानाही नियम धाब्यावर बसवून मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कांबारे–वाशिंद हा मार्ग अत्यंत अरुंद असून, येथे अनेक ठिकाणी तीव्र वळणे आणि उतार आहेत. अशा धोकादायक रस्त्यावरून अवजड वाहने बेदरकार वेगात वळणे कापत असल्याने समोरून येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर वनखात्याच्या चौक्या अस्तित्वात असतानाही वाहनांची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे चौक्यांवरील वनकर्मचाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, अपघात झाल्यास त्यांनाही सहआरोपी धरावे, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. नियमांची अंमलबजावणी करण्याऐवजी दुर्लक्ष का केले जात आहे, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या पावसाळ्यात सावरोली गावाजवळील पूल खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तो धोकादायक घोषित केला होता. या पुलावर गर्डर टाकून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे याच अवजड वाहनांनी दोन वेळा गर्डर तोडून बेकायदा पुलाचा वापर केल्याचे समोर आले आहे. हे सर्व घडत असताना प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कायमस्वरूपी गर्डर किंवा झिगझॅग बॅरियर बसवून अवजड वाहनांचा प्रवेश पूर्णतः रोखण्याची मागणी केली आहे.