मुंबई

जिल्ह्यात वराहपालन व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल

CD

जिल्ह्यात वराहपालन व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल
शेतीपूरक व्यवसायातून समृद्धीकडे; तरुण शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक मार्ग
वाणगाव, ता. २७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसायावर अनिश्चिततेचे सावट आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीडरोग आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असताना, शेतीला पूरक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर उत्पन्न देणारे पर्यायी व्यवसाय महत्त्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत पशुपालन, कुक्कुटपालन व शेळीपालनाच्या जोडीला आता वराहपालन हा व्यवसाय पालघर जिल्ह्यात वेगाने नावारूपास येत आहे. या व्यवसायातून वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.
वसई, पालघर, वाडा, तलासरी आणि डहाणू तालुक्यांत गटाच्या माध्यमातून तसेच स्वतंत्र स्वरूपात अनेक शेतकरी वराहपालन व्यवसायाकडे वळले आहेत. कमी खर्चात अधिक नफा देणारा हा व्यवसाय असल्याने शेतकरीवर्गात त्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून वराहपालन सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला निश्चितच गती मिळू शकते, असे मत पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी व्यक्त केले. वराहपालन व्यवसायाचा प्रमुख फायदा म्हणजे खाद्यावरील कमी खर्च. हॉटेलमधील उष्टे अन्न, मेस, ढाबे, वसतिगृह, लग्नसमारंभातील उरलेले अन्न, तसेच भाजीपाला कचरा यांचा योग्य पद्धतीने वापर करून वराहांचे पोषण करता येते. यामुळे फॅटनिर्मिती वेगाने होत असून खर्च कमी आणि नफा अधिक मिळतो, अशी माहिती तलासरी येथील यशस्वी वराहपालक अनिकेत सोनवल यांनी दिली. जिल्ह्यात सध्या १०० ते १५० लहान-मोठे शेतकरी वराहपालन व्यवसायात सक्रिय असून, ‘लँडरेड’ व ‘ड्युरॉक्स’ या जातींच्या डुकरांचे संगोपन मोठ्या प्रमाणात केले जाते. स्थानिक पातळीवरही वराहाच्या मांसाला चांगली मागणी आहे. बोईसरमधील टॅप्स कॉलनी परिसर, तसेच वसई तालुक्यात ख्रिस्ती बांधवांची लोकसंख्या जास्त असल्याने येथे वराह मांसाचा मोठा बाजार आहे. ठरावीक दिवशी फार्मवरच कटाई केल्याने मांस खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसते.
......................
लाखोंचा निव्वळ नफा
वसई, मुंबई, पुणे, नाशिक तसेच पंचतारांकित हॉटेल्स आणि दक्षिण भारतात वराहाच्या मांसाला मोठी मागणी आहे. याशिवाय प्रक्रिया करून पॅकिंगद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वराहाचे मांस पाठवले जाते. पालघर जिल्ह्यातून गोव्यासाठी दलालांमार्फत मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असल्याचे वराहपालक रवि सोनवल यांनी सांगितले. रवि सोनवल यांच्या मते, माझी वर्षाला सुमारे ३५ लाख रुपयांची उलाढाल होत असून, खर्च वजा करता सुमारे ३० लाखांचा निव्वळ नफा मिळतो. रोगराई व मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असल्याने या व्यवसायात जोखीम फारशी नाही. वराहपालनाबाबत पशुसंवर्धन विभागाकडून ‘क्लासिकल स्वाईन फिव्हर’सारख्या आजारांवर नियमित लसीकरण केले जाते. त्यामुळे व्यवसाय सुरक्षित राहतो. नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न देणारा हा व्यवसाय असल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नियोजनबद्ध वराहपालन सुरू करावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी केले आहे.
.........................
वराहपालन : महत्त्वाची आकडेवारी
जिल्ह्यातील वराहपालक : अंदाजे १०० ते १५०
गर्भधारणा कालावधी : ११४ दिवस
मादी वर्षातून दोनदा पिल्लांना जन्म देते
एका वेळी पिल्ले : ८ ते १२
विक्री कालावधी : ६ ते ७ महिने
सरासरी वजन : ८० ते ९० किलो
किलोचा दर : सुमारे २५० रुपये
एका वराहापासून उत्पन्न : २० ते २२ हजार रुपये

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

Latest Marathi News Live Update: राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी वन आणि खाण विभागाची आढावा बैठक घेतली

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकच उमेदवार ३ पक्षांकडून करत आहे अर्ज!

Team India U19: आयसीसी U-19 वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; कर्णधारपदाची धुरा कुणाकडे?

SCROLL FOR NEXT