अतिदुर्गम कुर्लोदचा आरोग्य सुविधांचा मार्ग अखेर सुकर
१५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन; आदिवासींना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २७ ः मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या कुर्लोद ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आले आहे. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे वर्षानुवर्षे हालअपेष्टा सहन करणाऱ्या आदिवासी नागरिकांसाठी हा क्षण आशेचा किरण ठरला आहे. विशेषतः महिला, गरोदर माता, नवजात बालके तसेच वयोवृद्ध नागरिकांना आता प्राथमिक आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोखाडा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या कुर्लोद परिसरातील सुमारे नऊ गावपाड्यांमधील तीन हजारांहून अधिक आदिवासी नागरिक आजवर आरोग्य सुविधांपासून वंचित होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भागातील नागरिकांना आजारपणात उपचारासाठी अनेक किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात रस्ते बंद झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत होती. अनेक वेळा वेळेवर उपचार न मिळाल्याने गरोदर माता, नवजात बालके, साथीच्या आजारांचे रुग्ण तसेच वृद्धांना प्राण गमवावे लागल्याच्या हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. शासनाकडून पावसाळ्यात केवळ चार महिन्यांसाठी तात्पुरते वैद्यकीय पथक नियुक्त केले जात होते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नव्हती. दरम्यान २०१० मध्ये कुर्लोद येथे आरोग्य उपकेंद्रास शासनाची मंजुरी मिळाली होती. मात्र, उपकेंद्रासाठी योग्य जागा उपलब्ध न झाल्याने प्रत्यक्ष बांधकामाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला. जागेअभावी प्रशासकीय प्रक्रिया रखडली आणि काही काळासाठी तर प्रशासकीय मान्यताही रद्द झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी दिली. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य विभागाने पुन्हा प्रयत्न करून नव्याने प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आली. या उपकेंद्राच्या उभारणीमुळे कुर्लोद व परिसरातील आदिवासी नागरिकांना तातडीची आरोग्यसेवा, लसीकरण, माता–बाल संगोपन तसेच प्राथमिक उपचार गावातच उपलब्ध होणार असून, ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.
..................
बॉक्स :
अडथळ्यांची शर्यत
२०१० मध्ये आरोग्य उपकेंद्रास मंजुरी मिळूनही जागेअभावी काम पुढे सरकू शकले नाही. प्रशासकीय मान्यता रद्द झाल्यानंतर स्थानिक नेते व प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे ती पुन्हा मिळवण्यात आली. याच काळात जयराम मोडक यांनी स्वतःची जागा मोफत देण्याचा निर्णय घेतला. जागा शासनाच्या नावे वर्ग करण्यासाठी अनेकदा शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागले. अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, कुर्लोदच्या आरोग्य सुविधांचा दीर्घ प्रतीक्षेचा अध्याय संपुष्टात आला. १ कोटी ६० लाख रुपये खर्चाची इमारत उभारण्यात येणार आहे. आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन सरपंच मोहन मोडक व भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस विठ्ठल चोथे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामदास मोडक, छबी मोडक, रोजगार सेवक राजेंद्र पालवे, देविदास दोंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.