ठाण्यात बिबट्याची दहशत
ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम सुरू; येऊर पायथ्याशी वावर वाढला
ठाणे, ता. २७ (बातमीदार) : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या ठाण्यातील येऊर पायथ्याशी गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कॉसमॉस सोसायटी आणि पोखरण रोड क्रमांक २ परिसरात बिबट्या प्रत्यक्ष नजरेस पडल्याने वन विभागाने आता बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. येऊर वनक्षेत्राला लागून असलेल्या नागरी वसाहती, अपूर्ण संरक्षण भिंत आणि सहज उपलब्ध होणारे खाद्य (भटकी कुत्री, पाळीव प्राणी) यामुळे बिबटे जंगलाचा अधिवास सोडून मानवी वसाहतींकडे वळू लागले आहेत.
गुरुवारी (ता. २५) कॉसमॉस सोसायटीत एका घरकाम करणाऱ्या महिलेला बिबट्या दिसला, तिने आपल्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरणही केले. तर दुसऱ्या दिवशी पोखरण रोड क्रमांक २ येथील ओबेरॉय गार्डन सिटीच्या सुरक्षा रक्षकाने बिबट्याचा फोटो काढला. घटनेचे गांभीर्य ओळखून वर्तकनगर पोलिस आणि वन विभागाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. एका खासगी विकसकाच्या १५० एकर विस्तीर्ण भूखंडापैकी ६० एकर परिसरात दोन हाय-टेक ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र दाट झाडी आणि बिबट्याच्या वेगामुळे अद्याप त्याचा ठोस ठावठिकाणा लागलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून बेथनी रुग्णालय आणि आसपासच्या परिसरात ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे. बिबट्याच्या पाऊलखुणा शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, रात्रीची गस्तही वाढवण्यात आली आहे.
बिबट्या दिसण्याचे ठिकाणे
टिकूजीनी वाडी, लोकमान्यनगर, नीलकंठ, कोकणी पाडा, हनुमाननगर, एअर फोर्स परिसर, येऊर गाव आणि उपवन तलाव.
सतत दोन दिवसांपासून ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. अद्याप तो कॅमेऱ्यात कैद झाला नसला तरी पुढील दोन-तीन दिवस ही शोधमोहीम आणि गस्त सुरूच राहील. नागरिकांनी सतर्क राहावे.
- नरेंद्र मुठे, वन परिक्षेत्र अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.