सण-उत्सवात रेल्वे सुसाट
२०२५ मध्ये ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : महाकुंभ, होळी, उन्हाळी सुट्ट्या आणि छटपूजेसारख्या वर्षभरातील प्रमुख प्रवासी हंगामात रेल्वे प्रवाशांची कोंडी टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली. २०२५ या वर्षात देशभरात ४३ हजारांहून अधिक विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या असून, या माध्यमातून कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या गंतव्य स्थानकांपर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, यंदा विशेष गाड्यांचे नियोजन अधिक काटेकोर पद्धतीने करण्यात आले. प्रवाशांची वाढती संख्या, वेळेवर सेवा आणि गर्दी नियंत्रण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. १३ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महाकुंभ यात्रेसाठी १७,३४० विशेष गाड्या चालवण्यात आल्या. लाखो भाविकांच्या प्रवासासाठी उभारलेली ही मोहीम रेल्वेच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विशेष उपक्रमांपैकी एक ठरली. तर, होळी २०२५ दरम्यान (१ ते २२ मार्च) १,१४४ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात आल्या. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या जवळपास दुप्पट असून त्यामुळे सणाच्या काळातील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये, १ एप्रिल ते ३० जून २०२५ या कालावधीत, प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन १२,४१७ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात आल्या. तसेच छटपूजा २०२५साठी १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात १२,३८३ विशेष रेल्वे फेऱ्या राबवण्यात आल्या. ही संख्या छटपूजा २०२४ पेक्षा लक्षणीयरीत्या अधिक आहे.
अनुभवातून केलेली तयारी
रेल्वे प्रशासनाच्या मते, २०२४ मधील सण-उत्सवांच्या काळातील अनुभवाच्या आधारे यंदाचे नियोजन अधिक प्रभावी ठरले. वाढत्या प्रवासी मागणीच्या काळातही रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न या आकडेवारीतून स्पष्ट होतो. सणासुदीच्या गर्दीतही प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवास मिळावा, यासाठी भारतीय रेल्वेने केलेले नियोजन यंदा ठळकपणे दिसून आले.
सण-उत्सवातील विशेष रेल्वे फेऱ्या
वर्ष - २०२४
- आस्था विशेष (३० जानेवारी-११ मार्च) : ३२६ फेऱ्या
- होळी विशेष (१२ मार्च-२ एप्रिल) : ६०४ फेऱ्या
- उन्हाळी विशेष (१ एप्रिल-३० जून) : १२,९१९ फेऱ्या
- छटपूजा विशेष (१ ऑक्टोबर-३१ डिसेंबर) : ७,९९० फेऱ्या
.....
वर्ष - २०२५
- महाकुंभ विशेष (१३ जानेवारी-२८ फेब्रुवारी) : १७,३४० फेऱ्या
- होळी विशेष (१-२२ मार्च) : १,१४४ फेऱ्या
- उन्हाळी विशेष (१ एप्रिल-३० जून) : १२,४१७ फेऱ्या
- छटपूजा विशेष (१ ऑक्टोबर-३० नोव्हेंबर) : १२,३८३ फेऱ्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.