रानवली शाळेच्या परसबाग उपक्रमाचे कौतुक
जिल्हा मूल्यमापन समितीची शाळेला भेट
श्रीवर्धन, ता. २७ (वार्ताहर) ः प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार शालेय परसबाग जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीने रानवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन उपक्रमांचे मूल्यमापन केले. या वेळी शालेय परसबागेत करण्यात आलेल्या कामाची तपशीलवार पाहणी झाली तसेच स्पर्धात्मक परीक्षकांकडून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक शाळा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निवडण्यात आली होती. शाळेच्या परिसरात भाजीपाला आणि फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. भाजीपाल्यांमध्ये मुळा, माठ, पालक, बीट, गाजर, मेथी, कोथिंबीर, वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, तूर, मटकी, पावटा आदींचा समावेश आहे. फळझाडांमध्ये जांब, पेरू, चिकू, अननस, नारळ, सीताफळ, लिंब, आवळा, शेवगा, पपई आणि स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. मूल्यमापन समितीच्या भेटीवेळी सरपंच सुरेश मांडवकर, समाजसेवक राजू जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कृणाली अडखळे, मुख्याध्यापक भिकू पांगारकर, सहशिक्षक नीलेश श्रीवर्धनकर, सहशिक्षिका मानसी माळवदे उपस्थित होते. जिल्हा पोषण आहाराचे लेखाधिकारी श्रीकांत मोरे या समितीचे प्रमुख म्हणून उपस्थित राहिले.
......................
शालेय परसबागेची वैशिष्ट्ये
संपूर्ण बागेला ठिबक सिंचन प्रणाली वापरून पाणीपुरवठा केला जातो. शाळेत सहा इको क्लब तयार केले आहेत, जे परसबागेची निगा राखतात. तयार होणारा भाजीपाला मध्यान्ह पोषण आहार योजनेत वापरला जातो, तर उर्वरित भाजीपाला दर शनिवारी विक्रीस ठेवला जातो. रानवली मराठी शाळा सलग तीन वर्षे शालेय परसबाग उपक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त करीत आहे. या भेटीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती, पिकांची योग्य लागवड, बागेची निगा राखणे आणि पोषण योजनेतील महत्त्व याबाबत सविस्तर माहिती घेतली. जिल्हा मूल्यमापन समितीने शाळेच्या कार्याची प्रशंसा करीत असे उपक्रम इतर शाळांसाठी आदर्श असल्याचे स्पष्ट केले.