पनवेल, ता. २७ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी प्रक्रियेला सुरुवात होऊन दुसरा दिवस उजाडला असला तरी शनिवारी (ता. २७) प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया ‘निरंक’ राहिली. दरम्यान, पाच दिवसांत एकूण ८५० उमेदवारी अर्जांची खरेदी झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त नानासाहेब कामटे यांनी दिली.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना अवघे दोन दिवस उपलब्ध आहेत. यामध्ये उद्याचा (ता. २८) दिवस रविवार सुट्टीचा येत असल्याने प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस मर्यादित झाले आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्याचा ताण येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. अर्ज स्वीकृतीसाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली असून, शेवटच्या दिवशी होणारा ताण लक्षात घेता उमेदवारांनी वेळेआधी अर्ज भरावेत, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
पाच दिवसांत तब्बल ८५० उमेदवारी अर्जांची खरेदी झाली असली तरी अद्याप एकाही इच्छुकाने अर्ज दाखल न केल्याने राजकीय समीकरणांची गुंतागुंत स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने अनेक इच्छुक उमेदवार अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अर्ज भरल्यास बंडखोरीचे चित्र निर्माण होऊ नये, यासाठीच बहुतांश इच्छुकांनी अर्ज भरण्यास जाणूनबुजून विलंब केल्याचे बोलले जात आहे.