ठाणे प्रदूषणाच्या विळख्यात
घोडबंदर मार्ग सर्वाधिक प्रदूषित ः श्वसनाच्या तक्रारी वाढल्या
ठाणे शहर, ता. २९ (बातमीदार) ः मुंबई उच्च न्यायालयाने हवेतील वाढलेल्या प्रदूषणाबाबत महापालिकांवर कडक शब्दांत ताशेरे ओढलेले असतानाही ठाण्याचे प्रदूषण नियंत्रणात आलेले दिसत नाही. दूषित हवेमुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. ठाण्यातील हवा प्रदूषणाचा एक्यूआय २०० पर्यंत जाण्याच्या वाटेवर असल्याने महाराष्ट्र आणि ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वाधिक प्रदूषणाचा फटका महामार्ग आणि रस्त्यांलगत असलेल्या नागरिकांना बसत आहे. त्यांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ठाणे पालिकेच्या परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. घोडबंदर महामार्ग, नाशिक महामार्गांवरदेखील रुंदीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण आणि मेट्रो यांची कामे केली जात आहेत. त्यामुळे परिसरात हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले असल्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे म्हणणे आहे. घोडबंदर महामार्गावरून दिवस-रात्र लाखो वाहनांची वाहतूक सुरू आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती असून, या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरत आहे, तर वाहनांच्या धुरातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइड वायूमुळेदेखील त्यांच्या घरांच्या दारे, खिडक्यांवर काजळी जमलेली दिसत आहे.
कासारवडवली परिसरात लावण्यात आलेल्या प्रदूषण मापक यंत्रामध्ये शहरातील सर्वात जास्त प्रदूषण या ठिकाणी होत असल्याची नोंद होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचे त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. परिसरातील रुग्णालयांमध्ये सर्वात जास्त रुग्ण कफ, ताप, घसा दुखणे, आवाज बसणे, छाती दुखणे, दम लागणे या प्रकारचे येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
एकाच वेळी आम्ही घोडबंदरकर वाहनांमधून निघणारा विषारी धूर आणि रस्ते व परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे निघणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडलो आहोत. घरातील फॅन चार-पाच दिवसांत पुसला नाही तर तो पूर्ण काळा झालेला असतो, यावरून या ठिकाणी प्रदूषणाचे प्रमाण किती आहे याची कल्पना येईल. येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
- गिरीश पाटील, जस्टिस्ट फॉर घोडबंदर, सदस्य
कासारवडवली प्रदूषण मोजणी यंत्र (डिसेंबर) :
२२ - १७९
२३ - १३८
२४ - ११५
२५ - ११०
२६ - ११४
२७ - १२९
सद्य:स्थितीच्या पातळीतील प्रदूषणात फुप्फुसांचे, दम्याचे आणि हृदयविकारांचे आजार असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. प्रदूषणाची पातळी २००वर येताच या प्रदूषणाचा निरोगी नागरिकांनाही त्रास होण्याची शक्यता आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी ठाणे पालिकेच्या विभागाला वेळोवेळी निर्देशित केलेले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आणि मंडळाच्या नियमावलीप्रमाणे पालिकेने काटेकोर अंमलबजावणी करायची आहे. आमचे पथकदेखील प्रदूषण पसरवत असलेल्या ठिकाणी धाडी टाकणार आहे.
- संजीव रेदासानी, अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे
कोट फोटो : १) निळे शर्ट - संजीव रेदासानी, अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे
२) दाढीवाले - गिरीश पाटील