डोंबिवलीत ‘तरुण कार्ड’
ठाकरे ब्रँडवर भरोसा, मनसे पुन्हा ॲक्टिव्ह
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ ः भाजप आणि शिवसेनेतील फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेले डोंबिवलीतील तरुण आता वेगळा पर्याय शोधताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेकडे तरुणांचा ओढा वाढत असून, डोंबिवलीत शेकडो तरुण-तरुणींनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश केला. तरुण कार्ड खेळी खेळत डोंबिवलीच्या राजकारणात मनसे पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मनसेचे काही माजी नगरसेवक काही दिवसांपूर्वी शिवसेना व भाजपमध्ये गेल्यानंतर मनसेला गळती लागल्याची चर्चा सुरू होती. मात्र, त्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांनी संघटनात्मक पातळीवर ‘भाकरी फिरवत’ शहरातील पदरचना बदलली. या बदलांचा परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागला असून, तरुणांची ताकद पुन्हा मनसेकडे वळत आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात मनसे कल्याण लोकसभा सचिव राहुल कामत, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे, उपजिल्हाध्यक्ष दीपेश नाईक, प्राजक्ता देशपांडे, चिराग ठक्कर, निधीश नायर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, या वेळी तरुणांसोबत त्यांच्या पालकांनीही मनसेत प्रवेश केला.
प्रवेश केलेल्या तरुणांनी आपल्या भाषणातून येत्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली. आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश करायचा आहे, अशी मागणी मोठ्या प्रमाणात आली होती. त्यानुसार आज शेकडो तरुणांनी मनविसेमध्ये प्रवेश केला, असे यावेळी सांगण्यात आले. या सगळ्या घडामोडींमध्ये डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांचा राजकीय एंट्री टोन ठळकपणे जाणवला. हे तरुण कोणत्याही नेत्यांना फोडून आमच्याकडे आलेले नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा ब्रँड तरुणांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण करणारा आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणापासून दूर जाऊन, एक सकारात्मक आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून ठाकरे ब्रँड जनतेसमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, असे घरत यांनी सांगितले.
राज ठाकरे आणि राजू पाटील यांनी तरुणांवर दाखवलेला विश्वास आणि मनविसे शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी, हा केवळ संघटनात्मक निर्णय नाही तर मनसेची पुढील रणनीती स्पष्ट करणारा राजकीय संकेत आहे. आगामी काळात पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश होतील, असे संकेत देत मनसेने डोंबिवलीतील राजकीय तापमान वाढवले आहे.
तरुणांना संधी देणार
आम्ही तरुणांना संधी देणार आहोत. जुन्या पद्धतीच्या राजकारणापेक्षा नव्या विचारांना, नव्या चेहऱ्यांना पुढे आणणार आहोत. नेत्यांनी आमच्यापासून थोडे लांब राहावे आणि तरुणांना काम करू द्यावे, असे सूचक विधान करत मनोज घरत यांनी डोंबिवलीतील राजकारणात मनसेचा नवा, आक्रमक आणि तरुणकेंद्री अध्याय सुरू होत असल्याचा स्पष्ट संदेश दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.