विक्रमगडमधून ‘पावली मांडव’ पद्धत नामशेष होण्याच्या मार्गावर
आधुनिकता आणि यांत्रिकीकरणामुळे भातपेंढा साठवणुकीचे ‘देशी तंत्र’ हरवले
विक्रमगड, ता. २८ (बातमीदार) : कोकण आणि पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली भातपेंढा साठवणुकीची पारंपरिक ‘पावली मांडव’ पद्धत आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागली आहे. आधुनिक शेती, यंत्रांचा वाढता वापर आणि बदलती जीवनशैली यामुळे विक्रमगड तालुक्यातील दुर्गम भागात एकेकाळी शेताच्या बांधावर दिसणारे हे पेंढ्याचे उंच मांडव आता दुर्मिळ झाले आहेत.
भात कापणी आणि झोडणी संपल्यानंतर उरलेला पेंढा पावसाळ्यातील ओलाव्यापासून वाचवण्यासाठी शेतकरी अनुभवातून ‘पावली मांडव’ उभारायचे. चार मजबूत लाकडी खांब, त्यावर बांबूचे आडवे माच आणि त्यावर रचलेला पेंढा, अशी ही रचना असायची. यामुळे पेंढ्याला खालून हवा खेळती राहायची आणि वरून सूर्यप्रकाश मिळाल्याने पेंढा कुजण्याऐवजी दीर्घकाळ टिकायचा. हा पेंढा वर्षभर जनावरांना चारा म्हणून, झोपड्यांची छप्परं शाकारण्यासाठी आणि खत तयार करण्यासाठी वापरला जात असे. अलीकडच्या काळात शेतीमध्ये बैलजोडीची जागा ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरने घेतली आहे. जनावरांची संख्या घटल्याने चाऱ्याची साठवणूक करण्याची गरज कमी झाली आहे. तसेच, पेंढा झाकण्यासाठी आता प्लॅस्टिक कागदाचा वापर वाढला आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील तरुण पिढी रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित झाल्यामुळे ही मेहनत घेणारे हातही आता कमी झाले आहेत. आज विक्रमगडच्या काही मोजक्याच गावांत उरलेले हे ‘पावली मांडव’ केवळ पेंढ्याचे ढीग नसून, गावकडच्या कष्टकरी जीवनाची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची अखेरची साक्ष देत उभे असल्याचे चित्र दिसत आहे.
वारसा जपण्याची गरज
‘पावली मांडव’ हे आमचे शेतीचे शहाणपण होते. यात कोणताही खर्च नव्हता आणि निसर्गाचे संतुलनही जपले जायचे, अशी हळहळ तालुक्यातील ज्येष्ठ शेतकरी व्यक्त करत आहेत. पर्यावरणपूरक शेती आणि स्थानिक ज्ञानव्यवस्थेचा हा उत्तम नमुना जपला जावा, असे मत कृषी अभ्यासक नितीन दिवा यांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.