जागावाटपावरून महायुतीत तणाव
भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण यांची तातडीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील तणाव शिगेला पोहोचला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (ता. २८) तातडीची बैठक घेत कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला. वरिष्ठांनी घेतलेला निर्णय मान्य करा आणि आहे त्या जागांवर समाधान मानून महायुतीचा धर्म पाळा, असा स्पष्ट आदेश चव्हाणांनी दिला आहे.
केडीएमसी निवडणुकीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला आहे, त्यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. विशेषतः कल्याण पूर्वमध्ये भाजपला अवघ्या सात जागा मिळाल्याने आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. कल्याण पश्चिममध्येही अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने पदाधिकारी नाराज आहेत. भाजपची संघटनात्मक ताकद मोठी असताना शिवसेनेला (शिंदे गट) झुकते माप दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
रवींद्र चव्हाणांची मध्यस्थी
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील निवासस्थानी कल्याणमधील प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले, की युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरचा नसून तो राज्य स्तरावरील नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे पक्षाची शिस्त मोडून बंडखोरी करणे खपवून घेतले जाणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिल्याचे समजते.
आमदार गायकवाड यांची भूमिका
बैठकीनंतर आमदार सुलभा गायकवाड म्हणाल्या, कार्यकर्त्यांच्या भावना रास्त आहेत आणि आम्ही त्या नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या आहेत; मात्र आता युतीतूनच निवडणूक लढण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. पक्षहित लक्षात घेऊन आम्हाला मिळालेल्या जागांवरच पूर्ण ताकदीने लढावे लागेल. रवींद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे तूर्तास आंदोलने थांबली असली तरी कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता कायम आहे. ‘आहे त्या जागांवर समाधान मानणे’ भाजपच्या आक्रमक केडरला कितपत पचनी पडते, हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत स्पष्ट होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.